चिपळूण : शिवसेनेचे शहरप्रमुख व नगर परिषदेतील सेनेचे गटनेते राजू देवळेकर हे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नगर परिषदेतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. पालकमंत्र्यांच्या पालिकेतील बैठकीला उपस्थित न राहण्याची सभ्यता व प्रोटोकॉल न पाळणाऱ्या देवळेकर यांच्याबाबत कठोर निर्णय घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील विभागप्रमुख व उपविभागप्रमुखांनी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्याकडे केली आहे. जिल्हाप्रमुख कदम यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, शहरप्रमुख झाल्यापासून तीन महिने व्हायला आले, या कालावधीत पक्षाची एकही बैठक नाही. कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा नाही. केवळ बॅनरबाजी करुन पक्ष वाढत नाही. देवळेकर यांच्याकडे पालिकेतील गटनेतेपद असताना त्यांना शहरप्रमुख पद दिले गेले. दोन्ही पदांवर त्यांचे काम अत्यंत निराशाजनक आहे. वर्षभरावर नगर परिषदेच्या निवडणुका आल्या आहेत. असे असताना पालिकेत शिवसेना विरोधी पक्ष म्हणून कुठेही दिसत नाही, असे उघडपणे बोलले जाते. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बैठक पालकमंत्र्यांनी बोलविली असताना देवळेकर यांनी दांडी मारली, यावरुन शहराविषयी त्यांना किती प्रेम व आस्था आहे हे दिसून येते. १४ महिन्यांवर निवडणूक आहे. शहरप्रमुखांनी त्यादृष्टीने पक्षाला फायदेशीर ठरतील, अशा विकासकामांबाबत पालकमंत्र्यांना सूचना करणे आवश्यक होते. परंतु, निवडणूक तोंडावर असताना त्यांच्याकडून कसल्या प्रकारची तयारी अथवा नियोजन नाही. वरिष्ठांनी वेळीच लक्ष दिले नाही तर पालिकेतील चार नगरसेवकांचा आकडा दोनवर येईल. निवडणुकीत अपयश पदरात पाडून घेण्यापेक्षा स्थानिक पदाधिकारी व वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ती दखल घ्यावी. पालकमंत्र्यांच्या दौऱ्याला दांडी मारुन त्यांचा अपमान करणाऱ्या शहरप्रमुखावर कठोर कारवाई करावी, अशी आमची इच्छा आहे. सध्या शहरातील संघटनेला मरगळ आली आहे. तरुण कार्यकर्ते पक्षापासून दूर आहेत. पालिकेवर भगवा फडकवावा, यासाठी व पक्षहितासाठी आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. या पत्रावर मार्कंडी विभागप्रमुख संतोष पवार, बंड्या खेराडे, बापू चिपळूणकर, मंगेश शेलार, बाळशेठ परांजपे, उपशहरप्रमुख उमेश पवार, पेठमाप विभागप्रमुख मनोज शिंदे, उपशहरप्रमुख किशोर पिंपळे, युवा सेना विभागप्रमुख प्रमोद बुरटे, ओझरवाडी मतेवाडी विभागातील पदाधिकारी, गोवळकोट विभागातील विभागप्रमुख संजय कासेकर व सर्व पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
राजू देवळेकर यांच्यावर कारवाईची मागणी
By admin | Updated: October 30, 2015 23:39 IST