सावंतवाडी : एसटी कर्मचाऱ्यांचा करार २०१२-१६ मध्ये मान्यताप्राप्त कामगार संघटनेने १० टक्के वेतन वाढीस सहमती दर्शविली होती. परंतु, राज्यभर कामगारांनी केलेल्या मतदानामुळे १३ टक्के पगारवाढ मिळाली असली, तरी ही पगारवाढ समाधानकारक नसल्याने बुधवारी येथील बसस्थानकावर ‘हमारी मांगे पुरी करो’ अशाप्रकारच्या घोषणा एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या. यावेळी एच. बी. रावराणे, अशोक राणे, बी. जे. तुळसकर, आशिष काणेकर, आर. आर. राणे आदी उपस्थित होेते. औद्योगिक कलह अधिनियम १९४८ मधील तरतुदीनुसार कामगार करार मोडीत काढण्यात यावा व एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, २० जुलै २०१० ते ३१ मार्च २०१२ पर्यंतच्या किमान वेतनाची उर्वरित थकबाकी देण्यात यावी, कामगार करारांची उर्वरित थकबाकी तत्काळ देण्यात यावी, महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध सोयी सवलती देण्यात याव्यात, तसेच कायद्याप्रमाणे ठरलेल्या वेळेतच काम देण्यात यावे, एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार खात्यांतर्गत बढती देण्यात यावी, सन २००० ते २०१२ पर्यंत ज्या कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी ३ वर्षांपेक्षा जास्त अथवा ५ वर्षे सेवा पूर्ण केली आहे, अशा कर्मचाऱ्यांचे ज्यावेळी ३ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्या त्यावेळी नियमित वेतनश्रेणी देऊन वेतन निश्चिती करण्यात यावी, अशा विविध मागण्यांकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्या. यात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)
पगार वाढीविरोधात घोषणाबाजी
By admin | Updated: August 13, 2014 23:31 IST