दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या कामावरून अचानक कमी करण्यात आल्याने पुनश्च सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या कंत्राटी कामगारांपैकी सुरेश फटी नाईक (वय ४७) यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर पाच जणांवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, माजी आमदार प्रमोद जठार यांनी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेत त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करुन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी सायंकाळी आंदोलन मागे घेतले.गोवा आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी प्रकल्पावर सन १९८५ ते १९९२ पर्यंत हजेरीपटावर कंत्राटी कामगार कार्यरत होते. त्यांच्याकडून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील माती चाचणी, वसाहत देखभाल दुरुस्ती व पाणी पुरवठा अशी कामे करून घेतली जात होती. परंतु १९९२ नंतर हजेरीपट ठेकेदारी पध्दतीवर ही कामे केली जाऊ लागली. याच दरम्यान कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली. परंतु त्याकडे प्रकल्प अधिकारी आणि प्रशासनाने कानाडोळा केला. तसेच दोन महिन्यांपूर्वी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही, असे कारण सांगून काही सफाई कामगार व कर्मचाऱ्यांनार दोन महिन्यांपूर्वी कामावरून कमी करण्यात आले. तसेच उर्वरित कामगारांना ३० नोव्हेंबर २०१४ पासून कमी करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या. परिणामी शासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात कंत्राटी कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गेले तीन दिवस उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्यांपैकी सहाजणांची प्रकृती खालावली आहे. त्यापैक्ी सुरेश फटी नाईक यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून नारायण फटी गवस, उदय नाईक, सुनील आत्माराम गवस, गणपत भिकाजी गवस व महादेव भिकाजी गवस यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोडामार्गचे तहसीलदार संतोष जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. त्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेतली. कामगारांच्या नोकरीचा प्रश्न हा भाजपचा झाला असून २१ नोव्हेंबरच्या मंत्रालयातील बैठकीत हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे सांगत जठार यांनी कामगारांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यांच्या आश्वासनानंतर कंत्राटी कामगारांनी उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)
सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली
By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST