कसई दोडामार्ग : तालुक्यातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन राजरोस सुरू असल्याबाबत शिवसेनेने आवाज उठविल्यानंतर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी कठोर भूमिका घेत गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करा व दोन दिवसात अहवाल कार्यालयात सादर करा, असे आदेश तहसीलदार संतोष जाधव यांना बुधवारी दिले. यावेळी तहसीलदार जाधव यांनी गौण खनिज उत्खनन बंद असल्याचा खुलासा केला. मात्र, संजय देसाई यांनी पुरावा देऊन गौण खनिज सुरू आहे, असे पटवून दिले. यावेळी तहसीलदार जाधव यांनी नरमाईची भूमिका घेत खाण मालकावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन प्रांतअधिकाऱ्यांनी दिले. तालुक्यात गौण खनिज उत्खननाला न्यायालयीन बंदी आहे. असे असताना महसूल विभागाच्या आशीर्वादाने हे गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्थानिक खाणमालकाला वेगळे नियम व गोवा राज्यातील खाणमालकाला वेगळे नियम लावले जातात. या विरोधात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय देसाई, संघटक संजय गवस यांनी आई व माटणे भागातील खाणींना भेटी दिल्या. यावेळी खाण सुरू होती. तलाठी अजित कदम यांना याबाबत माहिती देऊन खाणी बेकायदेशीर सुरू असून त्यांचे पंचनामे करून कारवाई करा, असे सांगितले. त्यानुसार कदम यांनी कारवाई केली. मात्र, खाणी बंद न झाल्याने बुधवारी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय देसाई, संघटक संजय गवस, युवक तालुकाध्यक्ष भिवा गवस, विभागप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, विजय कदम, गिरीश डिचोलकर, प्रदीप नाईक आदी उपस्थित होते. तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू आहे, हे प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत प्रांताधिकारी इनामदार यांनी सांगितले की, गौण खनिजाला न्यायालयीन बंदी असल्याने तालुक्यात गौण खनिज व्यवसाय बंद आहे, असे सांगितले. मात्र, संजय देसाई व संजय गवस यांनी खाण व्यवसाय कागदावर बंद आहे, परंतु प्रत्यक्षात सुरू आहे. तहसीलदार व तलाठी यांच्या आदेशाला खाण मालक घाबरत नाही, आमचे काय ते करून घ्या, अशा शब्दात खाण मालक मिरवत आहे. स्थानिकांच्या खाण व्यवसायाला आमचा विरोध नाही. मात्र, गोव्यातील खाणमालकांना आमचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. गौण खनिज व गौण उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी संतोष जाधव यांना धारेवर धरले. खाण व्यवसाय सुरू असताना कारवाई का केली नाही, अहवाल का पाठवला नाही, असे प्रश्न केले. यावेळी तहसीलदार जाधव यांनी सांगितले की, खाण मालकांना दंडात्मक कारवाई केली आहे. खाणी बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या. मात्र, आमचे ऐकत नाहीत, असे जाधव यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी यांनी, खाण मालकाची साधनसामग्री जप्त करा, त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करा आणि दोन दिवसात खाणी बंद करा, असे आदेश दिले. (वार्ताहर)
गौण खनिज उत्खनन बंद करुन अहवाल सादर करा
By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST