कणकवली : येथील उपजिल्हा रूग्णालयातून वयाचा दाखला देण्यासाठी घरेलू कामगार महिला तसेच इतर ग्रामस्थांकडून पैसे घेतले जात असल्यामुळे मंगळवारी उपस्थित डॉक्टरांना नगरसेवकांसह ग्रामस्थांनी घेराओ घालून जाब विचारला. यापुढेही उपजिल्हा रूग्णालयात अशीच स्थिती राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.उपजिल्हा रूग्णालयातून ग्रामस्थांना मोफत वयाचा दाखला देणे अपेक्षित आहे. मात्र, वयाचा दाखला घेण्यासाठी गेलेल्यांकडून वैद्यकीय अधीक्षक अभिवंत तसेच अन्य डॉक्टर प्रत्येकी १०० रूपये घेत असल्याची बाब उघड झाली. कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक किशोर राणे, गौतम खुडकर, सुविधा साटम, माधुरी गायकवाड यांच्याकडे घरेलू कामगार महिला तसेच अन्य ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे मंगळवारी या नगरसेवकांनी ग्रामस्थांसह उपजिल्हा रूग्णालयावर धडक दिली. तसेच उपस्थित असलेल्या डॉक्टरांना घेराव घातला. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांना याबाबत जाब विचारण्यात आला. अनेक ग्रामस्थांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिवंत तसेच डॉ. टाक व केसपेपर काढणारे कर्मचारी वयाच्या दाखल्यासाठी प्रत्येकी १०० रूपये घेत असल्याचा आरोप केला. काही ग्रामस्थांनी डॉ. टाक यांनी आपल्याजवळून पैसे घेतल्याचे सांगितले. तसेच केसपेपर काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलविण्यास सांगितले. मात्र, कर्मचारी उपस्थित नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर डॉ. टाक यांनी काही घरेलू कामगार महिला तसेच ग्रामस्थांचे पैसे परत दिले. त्यामुळे या प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला. (वार्ताहर)तक्रार करा : जाधवउपजिल्हा रूग्णालयात केसपेपर काढण्यासाठी रूग्णांकडून फक्त ५ रूपये आकारण्यात येतात. याव्यतिरिक्त रूग्णांनी रूग्णालयातील डॉक्टर अथवा कर्मचाऱ्यांना पैसे दिल्यास त्याची रितसर पावती घ्यावी. तसेच पावती न देणाऱ्यांविषयी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी यावेळी केले.
उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांना घेराओ
By admin | Updated: December 30, 2014 23:30 IST