आचरा : परंपरा जपणाऱ्या चिंदर गावची गावपळण पूर्ण झाल्याचा कौल ग्रामदैवत रवळनाथाने दिल्याने तीन दिवसांनी गावकरी गावात परतले. ग्रामस्थांनी सहजीवनाचा आनंद लुटून पुन्हा गाव गाठला आहे.दर तीन वर्षांनी होणाºया गावपळणीकरिता यावर्षी तब्बल १० वर्षांनी कौल दिल्याने १ ते ४ डिसेंबर या कालावधीत ही गावपळण झाली. मुंबईचे चाकरमानी, नातेवाईक, शेजारील गावातील ग्रामस्थ या गावपळणीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. गावाच्या सीमेलगतच्या आचरा, वायंगणी, कालावल, त्रिंबक येथे चिंदरवासीय झोपड्या उभारून आपले संसार थाटून राहिले होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनोखा अनुभव गावकºयांनी घेतला.तीन रात्रींच्या मुक्कामानंतर देव रवळनाथाचा कौल झाल्याने चिंदरवासीय मंगळवारी मिळेल त्या वाहनाने घराकडे धाव घेताना दिसत होते. ठिकठिकाणी थाटलेले आपले तात्पुरते संसार झटक्यात आवरताना दिसत होते. देवाच्या श्रद्धेपोटी ग्रामस्थ गावपळण कालावधीत रानावनात, काट्याकुट्यात निवांतपणे राहत होते. देवावरील श्रद्धेमुुळेच कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागले नाही, असे ग्रामस्थ अभिमानाने सांगत होते. सोशय मीडियावर गाव भरण्याचा कौल काही क्षणातच चिंदरवासीयांपर्यंत पोहोचल्याने तत्काळ ग्रामस्थ गावी येण्यास सुरुवात होऊन गावाचे जीवनमान पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.
कौल मिळताच चिंदर गाव पुन्हा भरला; तीन दिवस लुटला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:36 IST