सुभाष कदम - चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची अंतिम फेरी सुरु आहे. येथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत होत आहे. याशिवाय भाजपा, इंदिरा काँग्रेस हे पक्ष रिंगणात असले तरी त्यांची ताकद मर्यादित राहिली आहे. चुरशीच्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. अंतिम क्षणी बाजी कोण मारणार, याबाबत शेवटचे काही तास निर्णायक ठरणार आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. येथील लढत चौरंगी असली तरी मुख्य लढत शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांच्यात होत आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माधव गवळी व काँग्रेसच्या उमेदवार रश्मी कदम हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर राहतील, अशी स्थिती आहे. बहुजन समाज पक्षाचे प्रेमदास गमरे, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेश पवार, रिपब्लिकन सेनेचे सुशांत जाधव, रिपब्लिकन कांबळे गटाचे यशवंत तांबे, अपक्ष गोपीनाथ झेपले व संतोष गुरव यांची ताकद त्या त्या भागात मर्यादित आहे. यापैकी ६ उमेदवार संगमेश्वर तालुक्यातील असून, ३ उमेदवार चिपळूण तालुक्यातील आहेत. भाजपाचे माधव गवळी हे पुणे येथील असले तरी त्यांची कर्मभूमी चिपळूण राहिली आहे. या मतदार संघातील संगमेश्वर - देवरुख पट्ट्यात जिल्हा परिषदेचे सहा गट येतात. या भागात शिवसेना मजबूत स्थितीत आहे. शिवसेनेची ताकद या भागात कमी झाल्यास त्याचा लाभ राष्ट्रवादीला मिळू शकतो. संगमेश्वर तालुक्यातील काँग्रेस, रिपब्लिकन व इतर उमेदवार किती मते घेतात, यावरच शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहे. या उमेदवारांनी सेनेची अधिक मते घेतली तर शिवसेनेला त्याचा फटका बसेल. चिपळूण तालुक्यातील ३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवाराचा प्रभाव जाणवत नाही. उर्वरित सदानंद चव्हाण व शेखर निकम यांना येथे समान संधी आहे. मुळात चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट आहे. सर्व गटातटांचे कार्यकर्ते निकम यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. शिवाय निकम यांचा चेहरा लोकांना आकर्षित करणारा आहे. आमदार चव्हाण यांनी पाच वर्षे आमदार म्हणून काम केले असले तरी चिपळूणमध्ये त्यांचे कोणतेही प्रभावी काम नाही. त्या तुलनेत निकम यांनी या-ना त्या मार्गाने अनेकांना सहकार्याचा हात दिला आहे. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत मिळण्याची अधिक शक्यता आहे. शिवसेनेचा असलेला पारंपारिक मतदार शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. सावर्डेपट्ट्यात पक्षांतराचे काही प्रयोग झाले. तरीही त्याचा सेनेला फारसा फटका बसलेला नाही. संगमेश्वर तालुक्यात भाजपाचा एक जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गवळी जितकी अधिक मते घेतील त्याचा शिवसेनेला अधिक फटका बसेल. गवळी यांना विजयापर्यंत पोहोचता आले नाही तरी सेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्याइतपत त्यांचे बळ वाढलेले आहे. काँग्रेसच्या कदम यांनी सुरुवातीपासून शेखर निकम यांचे काम केले आहे. अखेरच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी मिळाली असली तरी काँग्रेसचे कार्यकर्ते यापूर्वी मनाने निकम यांच्याशी जोडले गेले होते. शिवाय या मतदारसंघात काँग्रेसचा फारसा प्रभावही नाही. या मतदार संघावर आज तरी शिवसेना व राष्ट्रवादी यांचाच पगडा अधिक दिसून येत आहे. दोन्ही उमेदवारांना विजयाची समान संधी आहे. उरलेल्या काही तासात जो उमेदवार अधिक मतदारांपर्यंत पोहोचेल व प्रभाव पाडेल, त्याचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आजघडीला येथील लढाई शिवसेना व राष्ट्रवादीसाठी तुल्यबळ झाली आहे. दोघांनाही विश्वास पण...चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात नातेवाईकांची लढत.काँग्रेस, रिपब्लिकन व अन्य उमेदवारांच्या मतांवर गणित.पक्षांतराचा फटका नक्की कोणाला.पारंपरिक मतदार ठरणार महत्त्वाचे.फिफ्टी फिफ्टीचा दावा. विजयाची समान संधी. राष्ट्रवादीतील गटतट एकत्र.शहरावर बरेच काही अवलंबून.
चिपळूणमध्ये कडवे आव्हान
By admin | Updated: October 12, 2014 23:34 IST