सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूलचा दोन दिवसांपूर्वी शमलेला वाद सोमवारी पुन्हा उफाळून आला. सिनिअर केजीच्या विद्यार्थ्याला प्रवेश नाकारण्यात आल्याने पालकांनी पुन्हा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.याबाबत माहिती अशी की, सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये सनम वसिम शेख या सिनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला फी वाढीला त्याच्या पालकांनी विरोध केल्याने बाहेर काढले होते. यावरून चार दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खुद्द अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना घटनास्थळी यावे लागले होते. तरीही यावर तोडगा निघाला नव्हता.अखेर ८ आॅगस्टला येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात दोन्ही बाजूच्या बैठका घेण्यात आल्या आणि त्यावर तोडगा काढला. यात संचालक तौकीर शेख यांनी १५ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्यात यावे. तसेच १५ आॅगस्टच्या बैठकीत विद्यार्थ्याला घेण्याबाबत ठराव करू, असे नमूद केले होते. त्यामुळे या वादावर पडदा पडला होता. पण सोमवारी पुन्हा याच विद्यार्थ्याला शाळेत बसून न दिल्याने नगरसेविका अफरोझ राजगुरू, वसीम शेख, अॅड. सनम ख्वॉजा, डायमंड शेख आदींनी शाळेच्या शिक्षकांना तसेच संचालकांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. हा वाद विकोपाला जात असल्याने घटनास्थळी पोलिसांना बोलाविण्यात आले.दुपारी दोन वाजेपर्यंत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू होता. पण कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, उपनिरीक्षक दाजी वारंग, दाजी सावंत, अमोल सरगळे यांनी या वादावर तात्पुरता पडदा टाकण्याचे काम केले असून, मंगळवारपर्यंत मुलाला शाळेत बसविण्याची हमी घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सेंट्रल स्कूलचा वाद पुन्हा उफाळला
By admin | Updated: August 11, 2014 21:58 IST