सावंतवाडी : बांद्याहून बिबवणेकडे जात असलेल्या दुचाकीमध्ये पावणेतीन लाखांची रोकड आढळून आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नेमलेल्या भरारी पथकाने इन्सुली पोलीस दूरक्षेत्रावर ही कारवाई केली आहे. याप्रकरणी सदाशिव सूर्यकांत कुबल (रा. बिबवणे, ता. कुडाळ) व विठ्ठल भागू लांबर (रा. विलवडे, ता. सावंतवाडी) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.निवडणूक आयोगाची भरारी पथके ठिकठिकाणी गाड्यांची तपासणी करीत आहे. अशीच तपासणी आज, गुरुवारी इन्सुली येथील पथकाने केली. विलवडेहून बिबवणेकडे जाणाऱ्या दुचाकीची (एमएच ०७ एन ७८५४) इन्सुली पोलीस दूरक्षेत्रावर भरारी पथकप्रमुख पी. एस. घाडगे यांनी तपासणी केली असता, गाडीच्या डिकीमध्ये दोन लाख ८० हजार सहाशे रुपये आढळून आले. भरारी पथकाने ही रक्कम ताब्यात घेत बांदा पोलिसांच्या स्वाधीन केली. बांदा पोलिसांनी दुचाकीचा पंचनामा करीत दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही रक्कम निवडणुकीच्या कामासाठी आली असल्यास दोन दिवसांत आयकर विभागाचे अधिकारी येऊन रीतसर पंचनामा करून पुढील कारवाई करणार आहेत. याबाबत माहिती उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
पावणेतीन लाखांची रोकड जप्त
By admin | Updated: October 9, 2014 23:01 IST