लांजा : तालुक्यातील रुण -सडवली गावचे ग्रामदैवत असणाऱ्या अचलेश्वर व भैरीदेवीच्या देवळातील चांदीचे ८ मुखवटे व इतर सोन्याच्या दागिन्यांसह अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दानपेट्या फोडल्याने जवळजवळ ६ लाखाचा ऐवज चोरण्यात अज्ञात चोरटा यशस्वी झाला असून या चोरट्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ व पोलीस यांनी एक रात्र एक दिवस संपूर्ण अरण्य पालथे घातले मात्र चोरट्यांचा मागमूस लागला नाही. रुण सडवली गावचे ग्रामदैवत असणारे अचलेश्वर व भैरीदेवीची दोन्ही देवळे रुण गावामध्ये आहेत. लोकवस्तीपासून असणाऱ्या या देवळामध्ये दरदिवशी पुजारी नेहमी पूजा करण्यासाठी येतो. बुधवारी सकाळी गणपत लिंगायत हे ९.३० वा. नेहमीप्रमाणे देवळात पूजा करण्यासाठी आले असता अचलेश्वर देवळातील दानपेटी फोडलेली दिसून आली. लगेचच त्यांनी शेजारी असणाऱ्या भैरी देवळाकडे धाव घेतली आणि त्यांना धक्काच बसला. भैरी देवळाच्या माळ्यावर देवाचे चांदीचे मुखवटे एका पत्रच्या मोठ्या पेटीमध्ये ठेवण्यात आले होते. याच माळ्यावर जाण्यासाठी असणाऱ्या दरवाजाचे कुलूप कटावणीने उचकटून काढले होते. तसेच या देवळातील दानपेटीदेखील अज्ञाताने फोडल्याचे दिसले.देवळाच्या माळ्यावर असणाऱ्या पत्र्याच्या पेटीचे कुलूप धारदार हत्याराने कापून त्यामधील ८ मूर्तींचे मुखवटे जवळजवळ १० किलो चांदीचे गेल्यावर्षी नवीन बनवलेले सोन्याच्या पुतळ्या ६१ नग, सोन्याच्या दोन चैनी, सोन्याचा गंडा, चांदीच्या दोन चैनी, देवीच्या नाकातील मोत्याची नथ १४ नग, चांदीचा पाळणा, वेलाची चांदीची पाने ६ नग, चांदीचे रुपये १५ नग, रोख रक्कम असा जवळजवळ ६ लाखाचा ऐवज अज्ञाताने चोरीस गेला आहे.देवळातील पुजारी गणपत लिंगायत यांनी पोलीस पाटील ायंना तात्काळ चोरीची पूर्वकल्पना दिली. त्यानंतर लांजा पोलीस यांना चोरीची माहिती देण्यात आली. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर रुण सडवली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लांजा पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. त्यानुसार श्वानाने १ किमीपर्यंत चोरट्यांचा माग काढण्यात यश मिळवले. मात्र त्यानंतर त्याला अपयश आले. (प्रतिनिधी)रुणमध्ये घटस्थापना झालीच नाहीचोरट्याचा शोध लावण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशीललांजा : घटस्थापनेच्या पूर्वंध्येला तालुक्यातील रुण सडवली गावच्या ग्रामदैवत असणाऱ्या अचलेश्वर व भैरी देवळातील देवीचे मुखवटे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने आता देवळात देवाची घटस्थापना करायची कशी? असा प्रश्न रुणमधील गावकऱ्यांना पडला आहे. तालुक्यातील रुण गावामध्ये अचलेश्वर व भैरी देवीची शेजारी शेजारी मंदिरे आहेत. त्यामधील भैरी देवळाच्या माळ्यावर एका पत्र्याच्या मोठ्या पेटीमध्ये भैरी देवीचा १, ब्राह्मणदेव १, जाकादेवीचे २, निनादेवी २, गिरमादेवी २ असे एकूण १० किलो चांदीचे ८ देवीचे मुखवटे ठेवण्यात आले होते. इतर दागिनेही चोरीला गेल्याने ,घटस्थापनेपासून पुढील नऊ दिवस हे मुखवटे देवाला चढवले जातात. त्याला रूपे लावणे असे म्हणतात. मात्र आता मुखवटेच चोरीला गेल्याने घटस्थापना करायची कशी? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. सडवली व रुण गावचे हे ग्रामदैवत असून सडवलीची पालखी वेगळी असल्याने या देवाचे मुखवटे हे सडवलीमध्ये ग्रामस्थ आपल्या गावी घेवून जातात. मात्र रुण गावातील पालखीचे जवळजवळ गेल्यावर्षी नव्याने बनवण्यात आलेले चांदीचे मुखवटे चोरट्यांनी चोरुन नेल्याने रुण ग्रामस्थांपुढे देवांची घटस्थापना करायची कशी? असा प्रश्न उभा राहिला आहे. देव चोरीला गेल्यापासून दोन्ही गावातील ग्रामस्थ बुधवारपासून देवळात एकत्र येवून संपूर्ण गावातील जंगले पायपीट करुन कुठे चोरीला गेलेले मुखवटे अगर चोराचा काय माग लागतो का? असा प्रयत्न करत आहेत. ऐन घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला देवाच्या मुखवट्याची चोरी झाल्याने ग्रामस्थांच्या बैठका होत असून हा अज्ञात चोरटा कोण असावा याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न चालू केला आहे. तसेच सडवली येथील एका व्यक्तीवर ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
रुणमधील मंदिरात धाडसी चोरी--घटस्थापना झालीच नाही
By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST