राजापूर : इंग्रजी माध्यम शाळांच्या वर्चस्वाचा फटका मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांना बसत आहे. घसरणाऱ्या पटसंख्येमुळे मागील दोन वर्षात शून्य पटसंख्येच्या चार शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३६७ शाळा असून, त्यामध्ये ३४९ मराठी, तर १८ उर्दु माध्यमाच्या आहेत. मागील काही वर्षे इंग्रजी माध्यमांचे वर्चस्व निर्माण होत असल्याने त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना बसू लागला आहे. त्यातूनच घसरत जाणारी पटसंख्या शुन्यावर आलेल्या चार शाळा चक्क बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर येऊन ठेपली आहे. वाटूळ, करक नं. ४, बागकाझी उर्दु शाळा व तिथवली धनगरवाडी या शाळांचा त्यामध्ये समावेश आहे. इंग्रजी माध्यमाकडे कल वाढल्याने चालू वर्षी जिल्हा परिषदेचा तालुक्यातील शाळांची एकूण पटसंख्या १ हजार ९३२ घटली. ती १३ आता हजार ५९४ एवढी झाली आहे. शाळांची ही घसरण कायम राहिली, तर यापुढे मराठी शाळांचे भवितव्य अधांतरी बनेल. त्यामुळे घसरणारी पटसंख्या थोपवण्याची मोठी जबाबदारी शिक्षण विभागावर आली आहे. तालुक्यातील मराठी शाळांसाठी ही धोक्याची घंटा आहे. सध्या पटसंख्येअभावी जिल्हा परिषद मराठी शाळांची स्थिती अधिकच खालावत चालल्याचे चित्र असतानाच इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुगीचे दिवस आले आहेत. विशेषकरून पालकांचाच इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे अधिक कल असलेला दिसून येतो. त्यामुळे जिल्हा परिषद मराठी शाळांच्या भवितव्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.पूर्वी मराठी माध्यमाच्या शाळा अधिक व सोयीच्या असल्याने त्या भागातील पालक आपली मुले या शाळांमध्ये दाखल करत होते. सध्या अशा शाळांमध्ये इंग्रजीचे आक्रमण सुरु झाल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)घसरणाऱ्या पटसंख्येमुळे मागील दोन वर्षात शून्य पटसंख्येच्या चार शाळा बंद करण्याची वेळ.इंग्रजी माध्यमाचे वर्चस्व निर्माण होत असल्याने जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना बसतोय फटका. शाळांची ही घसरण कायम राहिली तर यापुढे मराठी शाळांचे भवितव्य अधांतरी.पटसंख्या थोपवण्याची गरज.
मुले वळताहेत इंग्रजी माध्यमांकडे...
By admin | Updated: November 7, 2014 23:42 IST