चिपळूण : ग्रंथ हेच मानवाचे गुरु आहेत. ग्रंथ हा अडचणीच्या काळात माणासाचा वाटाड्या असतो. पुस्तक वाचनाने माणूस मोठा होतो. पुस्तके ज्ञान देतात. वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. परंतु, सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अशा महोत्सवाच्या माध्यमातून किमान एखादे पुस्तक खरेदी करुन ते वाचले पाहिजे. यापुढे ग्रंथोत्सवात किमान १०० स्टॉल्स व लाखभर पुस्तकांचा खजिना हवा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली. येथील डी. बी. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, विभागीय शासकीय ग्रंथालय व डी. बी. जे. महाविद्यालयाच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम - पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, गटविकास अधिकारी गणेश पिंपळे, कृषी अधिकारी विनोदकुमार शिंदे, डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी, जिल्हा माहिती अधिकारी संजय देशमुख, कोकण विभाग माहिती उपसंचालक राजेसिंह वसावे, विजय चोरमारे, लोटिस्माचे प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले, सुहास बारटक्के उपस्थित होते. प्रा. विनायक बांद्रे यांनी सूत्रसंचालन केले. चोरमारे, देशपांडे व काळमपाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्व स्टॉल्सना भेट देऊन मान्यवरांनी तेथील पुस्तकांचा मनमुराद आनंद लुटला. विविध प्रकारची पुस्तके असणारे १६ स्टॉल्स येथे आहेत. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)
पुस्तक वाचनाने ज्ञानकक्षा रुंदावतात : राधाकृष्णन
By admin | Updated: January 29, 2015 00:07 IST