बांदा : मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेने जोरदार मोहीम उघडली असून इन्सुली तपासणी नाक्यावर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी तब्बल १३ चालकांवर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई केली. यातील बारा जणांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी दोन हजार प्रमाणे २४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.या कारवाईत खासगी आरामबस चालक जेकरीनो मॅगेस्टीन फर्नांडीस (वय ३८, रा. मडगाव-गोवा), शहाजी दिगंबर पवार (वय ४६, रा. चैतन्य कॉलनी, पुणे), राजेंद्र भैरु झोरे (वय ३६, रा. दोडामार्ग), हिंडरसी हिरा लालजी (वय ४२, रा. बनारस, मध्यप्रदेश), शिवाजी मारुती घोलप (वय ४६, रा. अहंकापुरी, पुणे), सुनिल दौलत गायकवाड (वय २९, रा. कराड-सातारा), साईकुमार शशिकांत भगतराव (वय ३२, भांडुप-मुंबई), अंकुश लवू नाईक (वय २९, रा. रेडी-वेंगुर्ले), षण्मुख ईश्वर भिंगे (वय ४३, रा. अक्कलकोट-सोलापूर), अनिलकुमार विठ्ठल चव्हाण (वय ३0, रा. बोर-पुणे), संतोषकुमार शिवाप्पा लमाणी (वय ३0, रा. रानबांबुळी-ओरोस), भगवान रामा वरक (वय ३0, रा. मणेरी-दोडामार्ग) यांच्यावर कारवाई करण्यात आली.वरील सर्वाना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. यातील अंकुश लवू नाईक याला उद्या शनिवारी सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)‘डंक अँण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाईयातील १0 वाहन चालक हे खासगी आरामबसचे आहेत. गोव्यातून मुंबई, पुणे येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बसच्या चालकांची कसून तपासणी केली असता यातील बहुतांश चालक हे मद्यप्राशन केल्याचे वाहतूक पोलिसांना आढळले. या चालकांची अल्कोमीटरने तपासणी केली असता त्यांच्या शरीरात दारुची मर्यादा ही प्रमाणापेक्षा अधिक आढळली. मद्यप्राशन करुन प्रवाशांच्या जीविताशी खेळणाऱ्या या चालकांविरोधात ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
मद्यपी चालकांना खाकीचा दणका
By admin | Updated: July 17, 2015 22:47 IST