रत्नागिरी : तालुक्यातील खेडशी -नवेदरवाडी येथे नव्याने विकसित होत असलेल्या सोलर सिटीसाठी काम सुरू असताना एका ठिकाणी भुयार आढळून आले आहे. डोंगरमाथ्यावरील हे ठिकाण नवेनगर म्हणून विकसित केले जात आहे. जमिनीचे खोदकाम करताना सुमारे ४५ फुटांपेक्षा अधिक लांबीचे भुयार आढळून आले आहे. या भुयाराबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हे भुयार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकही तेथे धाव घेत आहेत. रामदेवबाबांच्या पतंजली योगचे योगगुरु व सॉफ्टवेअर इंजिनियर एकनाथ पाटोळे (सावर्डे, चिपळूण) यांच्यासह चार मध्यमवर्गीयांच्या या सोलरसिटी प्रकल्पाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. वॉटर हार्वेस्टिंगसाठी सुमारे २५ चौरसमीटर्स आकाराचा ५ फूट उंचीचा खड्डा खोदण्यात आला होता. आतील सपाटीचे काम सुरू असताना दोन दिवसांपूर्वीच एका कोपऱ्यात जमिनीला छोटे भोक दिसून आले. तेथील माती हलवल्यानंतर आत भुयारसदृश आकार दिसून आला. त्यानंतर छोट्या शिडीच्या आधारे काही जणांनी आत जाऊन पाहणी केली असता पुढे सुमारे १५ ते २० मीटर लांबीचे मोठ्या रुंदीचे भुयार आढळून आले. लोकमत प्रतिनिधीनेही भुयारात जाऊन पाहणी केली असता पुढील भागात भुयाराचा आकार मोठा असून, अंधाराचे साम्राज्य असल्याचे आढळून आले. या ठिकाणच्या विहिरीच्या ठिकाणीही असा भुयारासारखा आकार आढळल्याने आधीच्या भुयाराशी त्याचा काही संबंध आहे काय, याबाबतचही चाचपणी करण्यात आल्याचे पाटोळे यांनी लोकमतला सांगितले. दोन दिवसांपूर्वी हे भुयार सापडल्यानंतर त्याठिकाणी काम करणारे व अन्य कोणी आत पडतील वा अन्य काही विपरित घडू नये म्हणून या भुयाराच्या तोंडावर प्लास्टिक कापड टाकून ठेवण्यात आले होते. याठिकाणी सापडलेल्या भुयारात शंकराची पिंडी सापडली, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काही नाही. आपण स्वत: या भुयारात जाऊन पाहणी केली आहे. आतील वातावरण प्रसन्न वाटते. या खोदकाम केलेल्या चौकोनी भागात वॉटर हार्वेस्टिंग केले जाणार असून, त्यातील पाणी जमिनीत मुरू दिले जाणार आहे. तसेच या चौकोनी खोदकाम केलेल्या भागात मध्यावर छोटे मंदिर बांधण्याचेही मूळ आराखड्यात ठरविण्यात आलेले आहे. आता याच भागात हे भुयार सापडल्याने मंदिर उभारणीबाबत चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)प्रकल्प उभारणी दरम्यान खोदकाम सुरू असताना हे भुयार सापडले आहे. ते नेमके कसले आहे, याबाबत माहिती नाही. परंतु भुयारात प्रवेश केल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरण वाटते. त्यामुळे या ठिकाणाजवळ मंदिर विकसित करण्याचा मानस आहे. -योगगुरू एकनाथ पाटोळे
खेडशी नवेदरवाडीत सापडले भुयार
By admin | Updated: August 9, 2014 00:35 IST