देवरुख : हिवाळा म्हटला की, कुडकुडायला लावणारी गुलाबी थंडी पडते. या गुलाबी थंडीच्या जोडीला दाट धुक्याची झालर दऱ्याखोऱ्यात दूरपर्यंत पसरलेली दिसते. मात्र, हीच धुक्याची लाट महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरते. या दाट धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्याने अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांनो दाट धुक्यापासून सावधानता बाळगा, असा इशारा देण्याची वेळ आली आहे.खरेतर थंडीच्या दिवसांमधून नदीकाठच्या गावांमध्ये गडद धुक्याची छाया पसरलेली दिसते. हे धुके सायंकाळी उशिरा आणि पहाटे अधिक प्रमाणात पाहायला मिळते. कोल्हापूर मार्गावर आंबा घाटामध्ये, साखरपा मुर्शी, तसेच संगमेश्वर-देवरुख मार्गावर करंबेळे घाटीमध्ये, लोवले-बुरंबी तसेच देवरुख-रत्नागिरी मार्गावर तुळसणी, पांगरी याबरोबरच मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्याचा विचार करता बावनदी, वांद्री, आंबेड, मानसकोंड, कुरधुंडा, गोळवली, तुरळ, आरवली या परिसरात धुक्याची मोठी लाट पसरलेली दिसते आणि हे धुके पहाटेच्या वेळी अधिक गडद होताना दिसते. सकाळी नऊ वाजेपर्यंत दाट धुके असते.गडद झालेल्या धुक्यातून मार्ग शोधणे कठीण होऊन बसते. त्यातच महामार्गावर अतिवेगाचा वापर केल्यास समोर अचानक आलेले वाहन न दिल्यास अपघात होतो. काही अंशी पहाटेच्या वेळी गाड्या मार्ग सोडून दरीत कोसळण्याचे अथवा झाडावर आदळण्याचे प्रसंग घडल्याचे दिसून येत आहेत.या साऱ्याचा विचार करुन वाहनचालकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवत दाट धुक्यामध्ये सावधानता बाळगून काळजी घेणे प्रवाशांच्या हिताचे आहे. धुक्यामुळे अपघात घडतात, अशा चर्चा अपघातस्थळी अथवा अपघातानंतर होताना ऐकायला मिळते. बुधवारी सकाळी ६.३०च्या दरम्यान स्वीफ्ट डिझायर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेला अपघातदेखील धुक्यामुळेच झाला असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले. सध्या होणाऱ्या अपघातामध्ये पहाटे चार ते सहा या काळात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. याचाच अर्थ हे अपघात धुक्यात काळजी न घेतल्यामुळे चालकांच्या चुकीमुळे घडतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालकांनी सतर्कता बाळगावी व वेगावर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)दाट धुके ठरतेय अपघाताला कारणीभूत.दाट धुक्यामध्ये हवेय वेगावर नियंत्रण.अपघाताला कारण ठरणाऱ्या धुक्यातून वाहन नियंत्रित वेगाने हाकणे गरजेचे.चालकांनी सावधानता बाळगल्यास अपघात टळतील. सतर्कता बाळगल्यास मनुष्यहानी टळेल.सुरक्षितता बाळगा.
दाट धुक्यापासून सावधानता बाळगा!
By admin | Updated: November 6, 2014 21:59 IST