अडरे : पुणे येथे महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीलभद्र जाधव यांना देऊन सन्मानित केले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, प्रधान सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बांगडे, दादा इदाते, खासदार संजय काकडे, आमदार रणभिसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शीलभद्र जाधव यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पत्नी विशाखा जाधव, डेरवणचे माजी उपसरपंच आत्माराम चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष नरेंद्र राजेशिर्के, अशोक जाधव, राजेंद्र जाधव, रेखा जाधव, पुष्पा जगताप, सुमेध जाधव आदी उपस्थित होते. जाधव यांनी आजपर्यंत समाजातील अनुसूचित जाती, भटक्या जमाती यांच्यासाठी सामाजिक कार्य केले आहे. २५ वर्षांपूर्वी तालुक्यातील कळंबस्ते येथे पी. एस. गमरे यांच्या घरी मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरु केले होते. तसेच सावर्डे येथेही मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू केले. त्यासाठी ३ कोटी रुपये मंजूर केले होते. त्याचबरोबर डेरवण, कुडप, अनारी, तळसर या गावात नळपाणी योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले. प्रांत अधिकारी रवींद्र हजारे यांची भेट घेऊन जातीचे प्रलंबित दाखले मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केले. (वार्ताहर)
शीलभद्र जाधव यांना पुरस्कार प्रदान
By admin | Updated: August 26, 2016 23:29 IST