रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथील मनीषा नागवेकर हिने वाहक ते सहाय्यक वाहतूक अधीक्षकपदाची मजल कष्ट, चिकाटी व जिद्दीतून पूर्ण केली आहे. शेतकरी कुटुंबातील मनीषा यांना तीन बहिणी व एक भाऊ असून, आई-वडिलांनी भाजी विकून अपार कष्ट करत चारही मुलांना शिक्षण दिले.पावस हायस्कूलमधून इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अभ्यंकर - कुलकर्णी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आई-वडील शेतमजुरीचे काम करत असल्याने बेताच्या परिस्थितीत आपले व भावंडांच्या शिक्षणाचे ओझे पेलले. आई-वडिलांना कष्ट सोसावे लागत असल्यामुळे मनीषा यांनी घरी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवीसाठी गोगटे - जोगळेकरमध्येच प्रवेश घेतला. सकाळच्या वेळात कॉलेज व दुपारनंतर खासगी नोकरी स्वीकारली. त्यामुळे सकाळी ६ वाजता घराबाहेर पडणाऱ्या मनीषा यांना घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे नऊ वाजत असत. घरी गेल्यानंतर त्या अभ्यासावर लक्ष करत असत. पदवीनंतर त्यांनी दोन वर्षे पदव्युत्तर शिक्षणदेखील पार्टटाईम नोकरी करत पूर्ण केले. एम. ए.नंतर त्यांनी पुन्हा शिकवणी सुरू केली. सलग आठ वर्षे त्या शिकवणी घेत असत.सन २००९मध्ये त्यांनी एस. टी.ची वाहक पदाची परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्या रत्नागिरी आगारात वाहकपदी रूजू झाल्या. त्यानंतर त्यांनी सरळसेवा भरतीमधून परीक्षा दिली व आता त्या सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून रत्नागिरी विभागात रूजू झाल्या आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळात सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून महिलावर्ग कार्यरत असल्या तरी वाहक ते सहाय्यक वाहतूक अधीक्षकपद अशी काही वर्षात प्रगती करणाऱ्या मनीषा पहिल्याच आहेत.कष्ट करण्याची ताकद असेल तर जिद्दीच्या बळावर येणाऱ्या कठीण प्रसंगावर मात करत प्रगती करता येते. नेमके मनीषा ऊर्फ काव्या रितेश पेडणेकर (लग्नानंतरचे नाव) यांनी ते साध्य करून दाखवले. आई भाजी विक्री करून वडिलांबरोबर घरसंसाराला हातभार लावत होती. वेळोवेळी आईने प्रोत्साहित केल्यामुळे यश मिळवू शकले. आज माझा मुलगा पाच वर्षाचा आहे. परंतु, आई त्याचा सांभाळ करत असल्यामुळे मी माझी नोकरी व तेथील कामकाज याला उत्तम प्रकारे न्याय देत आहे. आईने आम्हा सर्व भावंडांना वेळोवेळी प्रोत्साहित केल्यामुळे उच्च शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण आवश्यक असून, कष्टाची वृत्ती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाहक बनली सहाय्यक वाहतूक अधीक्षक
By admin | Updated: October 4, 2015 23:58 IST