एजाज पटेल -- फुणगूस --आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असूनही कोकणात आंबा, काजू, नारळ, सुपारी याप्रमाणे चंदनाच्या लागवडीवर भर दिला जात नाही. धार्मिक व औद्योगिक दृष्टीने महत्त्व लक्षात घेऊन कोकणात चंदन लागवड करावी व त्याचा सुगंध कोकणला द्यावा, असे मत येथील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. चंदनाच्या वाढीसाठी आवश्यक हवामान आणि वातावरण कोकणात उपलब्ध आहे. थोड्याशा पाणीपुरवठ्यावर आणि अंगमेहनतीवर दहा ते बारा वर्षांत लाखो रुपयांचे उत्पादन या लागवडीतून मिळू शकते. परंतु चंदनाच्या रोपवाटिका अद्याप विकसित झालेल्या दिसत नाहीत.चंदनाचे झाड २० ते ३० फूट उंच वाढते. चंदनाची पाने साधारण कडुनिंबाच्या पानासारखी असून, त्याला काळपट रंगाची फळे येतात. आयुर्वेदात औषधामध्ये चंदनाचा लेप वापरण्यात येतो. त्याच्या लाकडापासून विविध प्रकारची खेळणी, फर्निचर, पंखे, पेट्या, अत्तरे आदी तयार करण्याचे शेकडो उद्योग आजही कर्नाटकात आहेत. तसेच चंदनाचा अर्क काढून त्यापासून सुवासिक व औषधी तेल तयार करण्यात येते. साबण व सुवासिक वस्तू तयार करण्यासाठी चंदनाचा उपयोग होतो. चंदनाच्या मुळ्या अत्यंत गुणकारी असून, बिया व फळेसुद्धा औषधामध्ये वापरतात. मात्र, संधी असतानाही कोकण विभाग या उत्पादनापासून लांबच राहिला आहे.चंदनाच्या झाडाला विशिष्ट असा मनोवेधक सुगंध असल्याने जगभरातून त्याला प्रचंड मागणी आहे. चंदनाचे झाड तयार झाल्यानंतर अडीच ते तीन इंचाचे लाकूड वेगळे काढून विकण्याची पद्धत आहे. तसेच गाद्याला सुवास असल्याने त्याची विक्री स्वतंत्र केली जाते. त्यावर सुंदर नक्षीकामही केले जाते. कोकणातल्या जंगलात चंदनाची झाडे किरकोळ आढळतात. मात्र, हवामान आणि जमीन पोषक असल्याने व्यावसायिक दृष्टीकोनातून त्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्नाचे साधन मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.कोकणात चंदनाच्या लागवडीला मोठे प्रोत्साहन दिल्यास त्यातून शेतकऱ्याला उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध होऊ शकेल. त्याचा फायदा सर्वांना मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. लागवड महत्त्वपूर्ण ठरेल...लागवडीसाठी प्रयत्न होणे गरजेचे.हवामान पोषक.चंदन लागवडीसाठी आवश्यक ते प्रोत्साहन शासनाकडून आवश्यक. आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण शरीरसंभूतं वनस्पतीकडे लक्ष देणे गरजेचे. हक्काचे उत्पन्न मिळण्याची आशा.
कोकणला हवा चंदनाचा सुगंध
By admin | Updated: October 16, 2014 00:05 IST