सावंतवाडी : मी महाराष्ट्राचा झालो असलो तरी माझ्यावर पहिला अधिकार आहे तो सावंतवाडीकरांचा. त्यामुळे विकासाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. सावंतवाडी शहरात रोप वे सारखा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तो बीओटी तत्त्वावर राबवण्याची शासनाची भूमिका आहे, असे मत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. केसरकर सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने आयोजित पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सुषमा देसाई, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सुभाष मयेकर, आशिष पेडणेकर, रूपेश राऊळ, मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, भुषण देसाई, नगरसेवक विलास जाधव, राजू बेग, गोविंद वाडकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, सभापती शर्वरी धारगळकर, किर्ती बोंद्रे, वैशाली पटेकर, शुभांगी सुकी, माधवी मिशाळ, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख स्रेहा तेंडूलकर आदी यावेळी उपस्थीत होते.यावेळी केसरकर म्हणाले, सावंतवाडीने मला घडविले आहे. त्यामुळे सावंतवाडीचा विकास करणे ही माझी पूर्ण जबाबदारी आहे. अनेक शक्तीशी लढताना तुमची साथ नसती तर मी इथपर्यत पोचू शकलो नसतो, त्यामुळे मी जरी महाराष्ट्राचा झालो असलो तरी पहिला अधिकार हा सावंतवाडीकराचा आहे, असे सांगत सावंतवाडी परिसरात येत्या वर्षभरात एक तरी मोठा प्रकल्प आणणारच, असे सांगत सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने माझ्याकडे ज्या मागण्या ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्यावर माझा भर राहणार आहे.सावंतवाडीत रोप वे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा हा प्रकल्प असून शासन या प्रकल्पाला जास्तीत जास्त मदत करेल. पण हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर कसा राबवण्यात येईल, यावर भर द्या, असा सल्लाही मंत्री केसरकर यांनी नगरपालिकेला दिला. संत गाडगेबाबा मंडई बांधणे हे शासनाचे कर्तव्य आहे. पण हा प्रकल्प बांधत असताना पालिकेने तेथील दुकानदार तसेच नगरपालिका किती प्रमाणात रककम उभी करू शकते, त्यातील उर्वरित रक्कम शासन पूर्ण करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीतील विकास कामांबाबत उद्योगमंत्री व पालकमंत्री यांना माहीती दिली. तसेच कारिवडे, कोलगाव, मळगाव व माजगाव या परिसरात एखादा मोठा उद्योग यावा, अशी मागणी ही त्यांनी यावेळी उद्योगमंत्र्याकडे केली. तसेच पालिका जमिनीवर आरक्षणाबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.प्रास्ताविक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले तर आभार मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे यांनी मानले. पालिकेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महोत्सव काळात यशस्वी काम करणाऱ्या पोलिसांचा तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
सावंतवाडी शहरात रोप वे ला पालिकेची मंजुरी
By admin | Updated: December 29, 2014 23:36 IST