बांदा : कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या समस्यांबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांची लवकरच भेट घेत निवेदन देण्यात येणार असल्याचे भाजपा तालुुकाध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी सांगितले. त्यासाठी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी तक्रारी भाजप कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यात सुयोग्य ठिकाणी टर्मिनस होण्यासाठी पाठपुुरावा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातून मडुरा ते वैभववाडीपर्यंतच्या मार्गावर बोगदे नसल्याने या रेल्वे मार्गाचे दुपरीकरण व्हावे अशी मागणी मंत्री प्रभु यांचेकडे करण्यात येणार आहे. रेल्वेच्या टर्मिनसबाबत राजकीय वाद झाल्याने हा वाद बाजूला ठेवून मडुरा व मळगाव या जागांची पाहणी करुन रेल्वे प्रशासनाने ज्याठिकाणी सुयोग्य होईल त्याठिकाणी टर्मिनसची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.जिल्ह्यातील रेल्वे मार्गावरील रुळांची दुरवस्था, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना जिल्ह्यात थांबा मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.केंद्रीय रेल्वे मंत्रीपद सुरेश प्रभु यांच्या रुपाने जिल्ह्याला मिळाल्याने येथील रेल्वेच्या समस्या निश्चित सुटण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतदेखील प्रभु यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या, मागण्या याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात आणुन द्याव्यात, या मागण्या मंत्री प्रभु यांच्यापर्यंत मांडण्यात येतील, असे आवाहन तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेबाबतच्या तक्रारी सादर करण्याचे आवाहन
By admin | Updated: November 16, 2014 23:49 IST