वैभववाडीत युतीची मुसंडी
By admin | Published: February 23, 2017 11:54 PM2017-02-23T23:54:16+5:302017-02-23T23:54:16+5:30
पंचायत समितीत त्रिशंकू स्थिती : भाजप-शिवसेनेचा विजयी जल्लोष; काँग्रेसची पिछेहाट
वैभववाडी : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. निवडणुकीत शिवसेना, भाजप युतीने जोरदार मुसंडी मारली तर काँग्रेसची प्रचंड पिछेहाट झाली आहे. जिल्हा परिषदेची भाजप, शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली असून पंचायत समितीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या सहापैकी काँग्रेस ३, भाजप २ व शिवसेनेने एका जागेवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीत ९ जागा जिंकलेल्या काँग्रेसला यावेळी केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर भाजप शिवसेनेने युतीची विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला.
तहसील कार्यालयात सकाळी १०.३० वाजता टपाली मतांनी मतमोजणीची सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दीपा भोसले यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ९ मतदारसंघाची मोजणी एकाचवेळी सुरु केली. एकेका मतदारसंघाची मोजणी पूर्ण होईपर्यंत कसलाच अंदाज बाहेर पडत नव्हता. त्यामुळे पक्ष कार्यालये, पत्रकार व निकालासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची घालमेल सुरू होती. एकेका पंचायत समितीचे चित्र स्पष्ट होताच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत होती.
काँग्रेसने जिल्हा परिषदेचा कोळपेतील गड शाबूत ठेवला. या मतदारसंघात काँग्रेसच्या शारदा कांबळे यांनी भाजपच्या सुस्मिता कांबळे यांना १२११ मतांनी पराभूत केले. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या कोळपेतून हर्षदा हरयाण व भुईबावड्यातून दुर्वा खानविलकर विजयी झाल्या. मात्र, नासीर काझींच्या कोळपे पंचायत समितीत भाजपच्या सीमा नानिवडेकर केवळ १२६ मतांनी मागे पडल्या. तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांच्या भुईबावड्यातून दुर्वा खानविलकर यांनी ५४४ मताधिक्य घेतले.
भाजपने कोकिसरे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा जिंकून काँग्रेसला छोबीपछाड दिला. भाजपचे सुधीर नकाशे यांनी काँग्रेसचे उपसभापती बंड्या मांजरेकर यांच्यावर ८५१ मतांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, उंबर्डे मेहबूबनगर वगळता संपूर्ण कोकिसरे मतदार संघात काँग्रेसच्या बंड्या मांजरेकरांपेक्षा भाजपचे नकाशे वरचढ राहिले.
उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघात एकट्या मेहबूबनगरच्या जोरावर काँग्रेसचे अरविंद रावराणे यांनी शिवसेनेचे अरुण कदम यांच्यावर अवघ्या ९३ मतांनी निसटता विजयी मिळवला. तर कोकिसरे पंचायत समितीत भाजपच्या अक्षता डाफळे यांनी काँग्रेसच्या पूजा पांचाळ यांचा ७१० मतांनी दणदणीत पराभव केला.
लोरे मतदारसंघात शिवसेना, भाजपने सामूहिक लढत देऊन बांधकाम सभापती दिलीप रावराणेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.
शिवसेनेच्या पल्लवी झिमाळ यांनी काँग्रेसच्या दीपाली मेस्त्री यांचा ११६ मतांनी पराभव केला. शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी काँग्रेसचे शंकर बर्गे यांच्यावर २६४ मतांनी मात केली. मूळ काँग्रेसचे अपक्ष लढलेले अॅड. अजितसिंह काळे यांना डावलल्याची किंमत या मतदारसंघात काँग्रेसला मोजावी लागली. लोरे पंचायत समितीत भाजपचे लक्ष्मण उर्फ राजू रावराणे यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार रावराणे यांच्यावर ७० मतांनी दणदणीत विजय मिळवला.
वैभववाडी तालुक्याचा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप, शिवसेनेने वैभववाडी शहरात संयुक्त मिरवणूक काढून जल्लोष केला. तर काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी येथील पक्ष कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. काँग्रेसने ताब्यातील पाच जागा गमावल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाचे शल्य दिसत होते.
वैभववाडी तालुक्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला कधीही यश मिळवता आले नव्हते. मात्र यावेळी दोन पंचायत समिती व एक जिल्हा परिषदेची जागा जिंकून भाजप तालुक्यात काँग्रेसच्या बरोबरीत आला आहे. (प्रतिनिधी)