कणकवली : महाराष्ट्रात आणि देशात आता शिवरायांच्या विचारांचे सरकार आहे. शिवछत्रपतींचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार करीत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच कारभार होईल असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. तसेच कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्यदिव्य अशी शिवजयंती साजरी करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी माझा पुढाकार असेल, तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. कणकवलीत शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री राणे बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, बंडू हर्णे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, शिवप्रेमी उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती कणकवलीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य मिरवणूक काढत साजरी करत आहात. या ठिकाणच्या शिवजयंतीचा प्रवास तसा खडतरच होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक वर्ष रस्त्यात होता. त्याचठिकाणी शिवजयंती साजरी करावी लागत होती. आपले सरकार आल्यानंतर कोणाचाही विचार न करता सन्मानाने आपल्या राजांना योग्य ठिकाणी आणून बसवले आहे. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करत असताना माझ्या रयतेचे हित कशात आहे हे पाहिले. त्यामुळे काही बाबीमध्ये तडजोड होता कामा नये असे माझे मत आहे. त्यावेळी विरोध करणारे लोक होते, ते आता घोषणा देण्यासाठी पुढे पुढे करत आहेत असा टोलाही राणे यांनी लगावला.शिवजयंती ३६५ दिवस साजरी करायची असतेशिवजयंती ही फक्त दोनदाच साजरी करायची नसते, तर वर्षाच्या ३६५ दिवस साजरी करायची असते. याठिकाणी आवश्यक ते बदल करण्यासाठी आपल्या सुचना घेवून प्रशासकीय पातळीवर योग्य तो बदल केला जाईल. प्रशासन आपल्याला विश्वासात घेवूनच याठिकाणी काम करेल. याठिकाणी काम करत असताना कोणाचा विरोध सहन केला जाणार नाही आणि त्याची दखलही घेतली जाणार नाही असा इशाराही पालकमंत्री राणे यांनी यावेळी दिला.
शिवरायांच्या विचारानेच कारभार सुरू - मंत्री नितेश राणे
By सुधीर राणे | Updated: February 19, 2025 16:22 IST