रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या विविध गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. २०१४-१५ या वर्षात कोकण रेल्वेने केलेल्या गाड्यांच्या तपासणीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १०५६ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४ लाख ४४ हजार ७७८ रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच याच वर्षी कोकण रेल्वेने रेल्वे कायद्याच्या विविध कलमांचा भंग केल्याबद्दल ६१७ व्यक्तींविरोधात कारवाई केली असून, २ लाख ९७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच १४ जणांची तुरुंगात रवानगी केली.कोकण रेल्वेतून अनेक प्रवासी तिकीट न काढता प्रवास करतात. त्यांच्याविरूध्द कोकण रेल्वेने कडक मोहीम उघडली आहे. प्रत्येक स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांकडील तिकिटांची पडताळणी केली जाते. एखाद्या प्रवाशाकडे तिकीट नाही, असे आढळल्यास त्यांना दंड ठोठावला जातो. गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेने अशा १०५६ फुकट्या प्रवाशांना पकडले आहे. त्यांच्याकडून ४ लाख ४४ हजार ७७८ एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.कोकण रेल्वेने २०१४-१५ या वर्षात बेकायदा मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई केली. या वर्षभरात १३,२०५ मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत ५ लाख ५७ हजार ५४७ रुपये एवढी होती. हे सर्व जप्त केलेले मद्य रेल्वेत आणि रेल्वेच्या विविध स्थानकांमधील इमारतीमध्ये वाहतुकीच्या निमित्ताने आणण्यात आले होते. जप्त केलेले मद्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान कोकण रेल्वेने फुकट्यांवर केलेल्या कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)२०१४-१५ या वर्षात कोकण रेल्वेद्वारे पळून जाण्याचा प्रयत्न करणारी २६ मुले आढळून आली. त्यांची सुटका करुन त्यांना त्यांच्या पालकांच्या किंवा चाईल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वेच्या सुत्रांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वेची फुकट्यांवर कारवाई
By admin | Updated: July 14, 2015 21:45 IST