सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर कोलगाव तिठा येथे दुचाकीची रस्त्यावर ठेवलेल्या डंपरच्या स्टेपनीला धडक बसून अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार निवृत्त पोलीस कर्मचारी चंद्रकांत सीताराम बेळणेकर यांचा गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात काल (शुक्रवार) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. काल रात्री चंद्रकांत बेळणेकर हे माणगाव-वाडोस येथून आपल्या खासगी कामानिमित्त सावंतवाडीत येत होते. कोलगाव तिठा येथे डंपरचा टायर बदलण्याचे काम सुरू असताना रस्त्यावरच ठेवलेल्या डंपरच्या स्टेपनीला त्यांच्या दुचाकी (जीए ०१ वाय ५३०७)ची धडक बसून ते रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. येथील रहिवासी संतोष मुळीक यांनी स्थानिकांच्या मदतीने बेळणेकर यांना तातडीने आपल्या मारुती कारमधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बेळणेकर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना तत्काळ १०८ या रुग्णवाहिकेतून गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले, परंतु बांबोळी येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बेळणेकर हे सावंतवाडी येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. पाच वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते माणगाव-वाडोस येथे राहत होते. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सुभाष तेली करीत आहेत. (वार्ताहर)
निवृत्त पोलीस कर्मचार्याचा मृत्यू कोलगाव तिठ्यावर अपघात; दुचाकीची स्टेपनीला धडक
By admin | Updated: May 10, 2014 23:56 IST