दोडामार्ग : आयी येथील नवदुर्गा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अपघात होण्यास निव्वळ मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप शुक्रवारी पालकांनी केला. मुख्याध्यापक संभाजी कोळी यांच्या हलगर्जीपणाबाबत पालकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. तर शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी शाळेच्या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यावेळी उपस्थित असलेले समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी संस्थाचालकही या घटनेस जबाबदार असल्याचा आरोप करीत अशा संस्थेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली. वनभोजन नेमके कोठे जाणार होते, याची जराशीही कल्पना पालकांना प्रशालेने दिली नसल्याचे यावेळी उघड झाले. हरवळे-गोवा येथे वनभोजनासाठी जात असताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो रिक्षाला अपघात होऊन आयी हायस्कूलचे विद्यार्थी जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती प्रमोद कामत, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी आदींनी आयी हायस्कूलला भेट देऊन मुख्याध्यापक संभाजी कोळी यांना धारेवर धरले. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तसेच विद्यार्थ्यांना बसची सोय न करता रिक्षा टेम्पोतून नेल्याबद्दल जाब विचारण्यात आला. शिक्षण व आरोग्य सभापती आल्याचे समजताच तळेखोल व आयी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालकही प्रशालेत दाखल झाले. वनभोजन कोठे जाणार आहे, याची कल्पना मुख्याध्यापकांनी दिली नसल्याचे पालकांनी सांगितले. तसेच यासंबंधी पालकसंघाची बैठक होणे आवश्यक असताना तशी बैठक झाली नसल्याचे उघड झाले. या संपूर्ण अपघातास प्रशालेचे मुख्याध्यापक कोळी हेच जबाबदार असून अशा संस्थेची मान्यता रद्द झाली पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी शाळेच्या गैरकारभाराची चौकशी केली जाईल, असे आश्वासन पालकांना देत येत्या चार दिवसात स्कूल कमिटी व पालकसंघाची बैठक होऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याध्यापक कोळी यांना दिले.यावेळी आयी सरपंच प्रज्योती एकावडे, भरत जाधव, सुनील नाईक, चंद्रकांत पर्येकर राजू ठाकूर, नारायण गवस, कृष्णा पर्येकर, प्रमोद हरवाळकर, लाडू जाधव, रमेश ठाकूर, नारायण सावंत, रामकृष्ण दळवी, सुरेश गवस, सतीश गवस, भिकाजी तळकटकर, कृष्णा गवस, आनंद च्यारी, सतीश गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्थेकडून दखल नाहीआयी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना अपघात होऊन ते जखमी होण्याची घटना घडली असताना सुध्दा संस्थेच्या एकाही पदाधिकाऱ्याने भेट देऊन चौकशी न केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अशा बेजबाबदार व हलगर्जीपणे वागणाऱ्या संस्थेत आम्ळी आमची मुले का पाठवावीत, असा सवाल ग्रामस्थ आणि पालकांनी उपस्थित केला. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेकडून गंभीर दखलदरम्यान, या अपघाताची गंभीर दखल महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेने घेतली आहे. या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष रवींद्र मुळीक यांनी शुक्रवारी शाळेला भेट दिली. तसेच पालक जखमी विद्यार्थी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या घटनेची मंत्रालयीन पातळीवर चौकशी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अपघातास मुख्याध्यापक जबाबदार
By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST