सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख १६ पर्यटनस्थळांवर सफर करण्यासाठी प्रवेश कर आकारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने तयार केला असून, तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच तत्काळ अंमलबजावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर भेटीसाठी येणाऱ्या पर्यटकांवर प्रतिव्यक्ती कर बसविल्यास ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होऊन पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा ग्रामपंचायतीमार्फत पुरविल्या जाणार आहे. यासाठी महत्वाच्या १६ ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर पर्यटनकर लावण्यास परवानगी मिळावी म्हणून संबंधित ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. हे सर्व प्रस्ताव राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने पाठविले आहेत. या प्रस्तावांना शासनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. मात्र, मंजुरी मिळताच १६ ठिकाणच्या प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांना कर द्यावा लागणार आहे. प्रवेश कर आकारण्यात येणारी ठिकाणे मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग समुद्र संगम बीच, आयलंड बेट, तारकर्ली काळेथर प्रशस्त समुद्र किनारा, डॉल्फिन दर्शन, सुरुबन, देवगडमधील विजयदुर्ग किल्ला, श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर, सावंतवाडी तालुक्यातील किरणपाणी सूर्यास्त दर्शन, आंबोली धबधबा, आंबोली हिरण्यकेशी, नांगरतास राघवेश्वर व गणेश मंदिर, कावळेसाद पॉर्इंट, कणकवली तालुका सावडाव धबधबा, नापणे धबधबा, वेंगुर्लेत साहेबामंदिर समुद्रकिनारा, आरवली टाक किनारपट्टी, सागरतीर्थ किनारपट्टी, भोगवे बीच, किल्ले निवती व बीच, रेडी पांडवकालीन गणपती मंदिर, मोचेमाड समुद्रकिनारा.(प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ स्थळांवर प्रवेश कर
By admin | Updated: January 4, 2015 01:01 IST