मालवण : इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाजवळ ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत नोंदीत १२ हजार ६९२ कामगारांपैकी ४९०० बांधकाम कामगारांना ३ हजार रुपयेप्रमाणे अर्थसाहाय्य प्राप्त झाले असून उर्वरित ७ हजार ७९२ कामगारांना अर्थसाहाय्य व त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसाहाय्य मिळणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघ जिल्हा सरचिटणीस हरी चव्हाण यांनी दिली.बांधकाम कामगार कल्याण मंडळाजवळ नोंदीत कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसाहाय्य देण्यात येते. यामध्ये पहिलीपासून पदवीधरपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश आहे. तसेच एमएससीआयटी परतावा या अभ्यासक्रमाचा समावेश असून मार्च २०१५ अखेरपर्यंत २११६ प्रस्ताव प्रलंबित असून त्यासाठी ९१ लाख ८४ हजार ६५० रुपये एवढ्या निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत नवीन नोंदीत झालेल्या ७ हजार ७९२ बांधकाम कामगारांना प्रत्येकी ३०० रुपयेप्रमाणे २ कोटी ३३ लाख ७६ हजार एवढ्या निधीची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी ४ हजार ९०० कामगारांना १ कोटी ४७ लाख रुपये आर्थिक साहाय्य वाटप करण्यात आले आहे. तसेच कामगारांच्या पाल्यांना १५ लाख रुपये शैक्षणिक साहाय्य वाटप करण्यात आले आहे. यासाठी भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी, कामगार मंत्री, आयुक्तांची भेट घेऊन पाठपुरावा करीत आहेत. कामगारांनी खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन हरी चव्हाण यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
७७९२ कामगारांना मिळणार अर्थसाहाय्य
By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST