देवगड : देवगडच्या पर्यटनाचा ३५ कोटी रूपयांचा राज्यशासनाने आराखडा तयार केला असून केंद्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकारपरिषदेत दिली. तसेच देवगड नगरपंचायतीच्या प्रस्तावाला एक महिन्याच्या आत मंजुरी मिळून देवगड नगरपंचायत घोषित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.देवगड भाजपा तालुका कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, बबलू सावंत, महेश खोत आदी उपस्थित होते.देवगड तालुक्याचा ३५ कोटीच्या आराखड्यामध्ये विजयदुर्ग पर्यटन सर्कीट व देवगड पर्यटन सर्कीट यांचा समावेश आहे. देवगड पर्यटन सर्कीटसाठी २० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये देवगड किल्ल्याचे सुशोभिकरण, एसी रेस्टॉरंट, हॉटेल्स, बोटींग सुविधा, फुडप्लाझा या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.विजयदुर्ग पर्यटन सर्कीटमध्ये विजयदुर्ग खारेपाटण ते नापणे धबधबा या पर्यटनस्थळांचा पर्यटनदृष्ट्या तेथील बीच, दुकाने, लाईटहाऊस व अन्य बाबींचा विकास केला जाणार आहे. देवगड नगरपंचायत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. मंत्रालयस्तरावर संबंधित खात्याशी चर्चा केली असून त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्याने महिन्याच्या आतच देवगड नगरपंचायत घोषित होईल अशी माहिती जठार यांनी दिली.देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये प्रमोद जठार यांनी भेट दिली. यावेळी तेथील प्रभारी अधिकारी डॉ. लोटवडेकर यांच्याशी रिक्त पदाची माहिती घेतली. या रूग्णालयातील चारही महत्वाची डॉक्टरांची पदे रिक्त असून याबाबत त्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक वंदाळे यांच्याशी संपर्क साधून रिक्त पदांविषयी वस्तुस्थिती जाणून घेऊन त्यांनी आरोग्य उपसचिवांशी फोनवर संपर्क साधून देवगडमधील डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)विजयदुर्ग पर्यटन सर्कीटसाठी १५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्यटनासाठी जिल्ह्यातील ५० गावांमध्ये तंबुनिवास ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील २० गावांमध्ये हर्टस् उभारण्यात येणार आहेत. याच सर्कीटमध्ये कुणकेश्वर मिठबांव ते सावडाव धबधबा या पर्यटनस्थळांचाही पर्यटनदृष्ट्या विकास केला जाणार आहे.- प्रमोद जठार, माजी आमदार
देवगडच्या पर्यटनासाठी ३५ कोटींचा आराखडा
By admin | Updated: July 2, 2015 00:30 IST