नियमित शरीरसंबंध ठेवणाऱ्या महिलांच्या आयुष्यात रजोनिवृत्ती उशिरा येते असं एका संशोधनातून समोर आलं. नियमित शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या महिलांची मासिक पाळी लवकर बंद होते, असं रॉयल सोसायटी ओपन सायन्सचा अहवाल सांगतो. नियमित शरीर संबंध ठेवणं महिलांसाठी फायदेशीर असल्याचं यातून अधोरेखित झालं आहे. आठवड्यातून एकदा शरीरसंबंध ठेवणाऱ्या महिलांची मासिक पाळी लवकर बंद होण्याची शक्यता महिन्यातून एकदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांच्या तुलनेत २८ टक्क्यांनी कमी असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. नियमित शरीरसंबंध ठेवल्यामुळे शरीराला गर्भधारणा होण्याचे संकेत मिळतात. त्यानुसार शरीराच्या मासिक पाळीचं चक्र फिरतं. ते शरीरासाठी फायदेशीर असतं. याउलट मध्यमवयीन म्हणजेच ३५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिला नियमित शरीरसंबंध ठेवत नसल्यास त्यांची मासिक पाळी लवकर बंद होऊ शकते, असं अहवाल सांगतो. 'एखादी महिला नियमित शारीरिक संबंध ठेवत नसल्यास शरीराला गर्भधारणेबद्दलचे कोणतेही संकेत मिळत नाहीत. त्यामुळे शरीर ऑव्युलेशन प्रक्रिया (बीजकोश फुटून जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया) बंद करतं,' असं युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या मेगन अर्नोट यांनी सांगितलं. ऑव्युलेशन प्रक्रियेदरम्यान महिलांची रोगप्रतिकारकक्षमता कमी होते. त्यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. जवळपास ३ हजार महिलांशी संवाद साधून हे संशोधन करण्यात आलं. यासाठी महिलांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. गेल्या सहा महिन्यात तुम्ही किती वेळा शरीरसंबंध ठेवले, ते किती नियमित होते, असे प्रश्न महिलांना विचारले गेले. संशोधनात सहभागी झालेल्या ६४ टक्के महिलांनी त्या आठवड्यातून एकदा शरीरसंबंध ठेवत असल्याचं सांगितलं. तीन हजार महिलांपैकी १३२४ जणींनी म्हणजेच ४५ टक्के महिलांनी त्यांची मासिक पाळी नेमकी कधी बंद झाली, याची आकडेवारी सांगितली. या आकडेवारीची सरासरी काढल्यास महिलांची मासिक पाळी ५२ व्या वर्षी बंद होते.
नवं संशोधन... नियमित शरीरसंबंध ठेवल्यास महिलांना असाही मोठा फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 15:28 IST