सागर गुजर-- सातारा जिल्हा परिषदेच्या १९६२ पासूनच्या इतिहासात वाईकरांचा दरारा जिल्हावासीयांनी जवळून पाहिला आहे. वाई मतदारसंघातील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, नारायणराव पवार, हेमलता ननावरे, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ यांनी जिल्हा परिषदेचे नेतृत्व केले. लक्ष्मणराव पाटील यांनी १९८० ते १९९० असे सलग दहा वर्षांच्या कालावधीत अध्यक्षपद भूषविले. वाईकरांसारखेच ‘माणिक’ जिल्हा परिषदेच्या कोंदणात असते, तर कुणीही येतंय अन् कालवा करून जातंय, असं म्हणण्याची वेळ आली नसती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. झेडपी अध्यक्षांचा दरारा टिकायलाच हवा, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.कोरेगाव ग्रामपंचायतीमधील गोंधळाच्या वातावरणावरुन जिल्हा परिषदेतील अध्यक्षांच्या दालनात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. या पार्श्वभूमीवर जुन्या अध्यक्षांच्या कार्यपध्दतीला उजाळा मिळाला आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असो अथवा विषय समित्यांच्या सभा असोत. यामध्ये सध्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ घालण्यासाठी चढाओढ सुरू असलेली पाहायला मिळते. सर्वसाधारण सभेत तर शर्टाच्या बाह्या मागे घेऊन आणि घशाच्या शिरा ताणून पदाधिकारी बोलत असतात. राष्ट्रवादीच्या पूर्ण बहुमताची सत्ता असूनही याच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य चक्क विरोधकांचे काम बजावताना दिसतात. या सभांमध्ये अध्यक्ष माणिकराव सोनवलकर अनेकदा शांतीचे आवाहन करत असले तरी सभेत ‘बाजार’ सुरूच राहतो. हाच गोंधळ अनेकदा कमराबंद चर्चांच्या वेळीदेखील होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असते.माजी खासदार लक्ष्मणराव पाटलांचा सुवर्णकाळ यानिमित्ताने अनेकांना आठवतो. लक्ष्मणराव पाटील अध्यक्ष असताना ते बोलायला लागले की, केवळ डोळ्यांच्या धाकावर ते सभागृहातला गोंधळ थांबवायचे. विरोधकांना शांत करण्याचे शास्त्र आणि धारदार शस्त्र लक्ष्मणतात्या आधीच परजून ठेवायचे. नारायणराव पवार, माजी आ. चिमणराव कदम, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, भाग्यश्री भाग्यवंत, इतकंच काय तर ज्योती जाधवांंच्या काळातदेखील ज्या-ज्यावेळी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी त्यांनी हे वार चातुर्याने परतवले. माणिकरावांच्या डोक्यावरही नाईक-निंंबाळकर घराण्याचा हात आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या तालमीत तयार झालेल्या माणिकरावांनाही आता त्यांचे गुण घ्यावे लागणार आहेत. माणिकराव सुमारे वर्षापूर्वी अध्यक्षपदी बसले. अडीच वर्षांचा कालावधी त्यांना मिळाला आहे. राज्यमंत्री दर्जाचे हे पद आहे, हे ओळखून त्यांनी आपल्या पदाला शोभेल, असा बाज कार्यकर्त्यांनीही राखावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, यासाठी माणिकरावांना खरंखुरं स्वातंत्र्य मिळतंय का?, हाही प्रश्न उपस्थित होतोय.१९६२ पासून हे झाले अध्यक्ष१९६२ पासून यशवंत पाटील (पार्लेकर), भागवतराव देसाई, बाबूराव घोरपडे, चिमणराव कदम, लक्ष्मणराव पाटील, सुभाषराव देशमुख, शिवाजीराव महाडिक, जयसिंगराव फरांदे, नारायणराव पवार, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हेमलता ननावरे, भाग्यश्री भाग्यवंत, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ, माणिकराव सोनवलकर.सुळावरची पोळीझेडपीचे अध्यक्षपद म्हणजे सुळावरची पोळी असते. नुसता कुणाचा तरी हात डोक्यावर असून चालत नाही, तर स्वतंत्र विचार आणि ध्येयाने काम करण्याची वृत्तीही हवी. हीच वृत्ती तत्कालीन अध्यक्षांनी दाखविली होती.
‘झेडपी’ अध्यक्षांचा दरारा टिकायला हवा
By admin | Updated: October 12, 2015 00:34 IST