सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन संस्थेच्या वतीने रविवारी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते कर्मवीर यांच्या स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक बाबतींत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा विचार व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साताऱ्यातील कर्मवीर अण्णांच्या समाधीस मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. भारती पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, संस्थेचे कायदा सल्लागार ॲड. दिलावरसाहेब मुल्ला, संस्थेचे ऑडिटर प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते.
कर्मवीर समाधीस पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्याकडून संस्थास्तरावरील कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या सेवकांची माहिती घेतली. तसेच आवश्यक ती मदत केली जाईल, असे अभिवचनही त्यांनी दिले. यानंतर संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेतील सर्व सेवकांनी सामाजिक बांधीलकी म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी २.७५ कोटी रुपये मदत केली आहे. संस्थेतील सेवक आणि विद्यार्थी कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे, अशा सर्वांना मदत म्हणून १ कोटी २० लाख रुपयांचा निधी उभा केला आहे. त्याचबरोबर संस्थेच्या ३९ शाखांमध्ये कोरोना मार्गदर्शन व मदत केंद्र उभारले आहे, याची माहिती दिली.
दरम्यान, डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो ०९सातारा रयत संस्था
सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिनी रविवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते कर्मवीर स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. (छाया : जावेद खान)