मालवण : कुडाळचे प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांची कार्यपद्धती व न्यायदान हे संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे मालवण तालुका बार असोशिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे.या निवेदनात प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांच्याकडील मालवण तालुक्यातील न्यायदान करण्यासाठी दर आठवड्याच्या गुरुवारी दुपारी ३ वाजता मालवण तहसीलदार कार्यालय येथे तारीख मुक्रूर करतात. बोंबले याठिकाणी न्यायदान करण्यासाठी आले असता, त्यांचे एजंट तहसीलदार कार्यालयाच्या आवारात फिरत असतात. तसेच त्यांनी दिलेले निर्णय देखील मेरीटशिवाय दिलेले असल्याचे देखील आम्हा वकिलांच्या निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे वकिलांशी उद्धट बोलणे, त्यांना खटला हाताळू न देणे, त्यांच्या अपरक्ष प्रकरण काढून टाकणे, कित्येक जुनी प्रकरणे निकालाच्या कामी प्रलंबित असताना अचानक नवीन प्रकरणात विशेष लक्ष देऊन विशिष्ठ पक्षकाराच्या लाभात निर्णय देण्यासाठी घाई करणे, एखादी कागदपत्र प्रकरणे दाखल नसताना देखील न्याय निर्णयामध्ये ते कागदपत्र पहिले व त्याआधारे निर्णय दिला असा उल्लेख न्याय निर्णयात करणे एजंटामार्फत आलेल्या पक्षकारावर विशेष मेहरबानी करणे आदी गोष्टी बोंबले करीत आहेत.उपविभागीय अधिकारी कुडाळ येथे कोणीही वकील नवीन प्रकरण दाखल करण्यास गेले असता त्यांना तातडीने प्रकरण दाखल करून न घेता त्यांना सायंकाळ पर्यंत थांबवून ठेवणे असे प्रकार रवींद्र बोंबले यांच्याकडून होत आहेत. म्हणूनच वकील संघटनेला सदरचा ठराव घेणे भाग पडले आहे. तरी रवींद्र बोंबले यांची तातडीने चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी. असा प्रस्ताव जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे करण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, महसूल मंत्री व पालकमंत्री यांना पाठविण्यात आली आहे. यावेळी मालवण तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. समीर गवाणकर, गिरीश गिरकर, पी. यु. गावकर, लता कुबल, मिलिंद सुकाळी, माधवी बांदेकर, शिल्पा टिळक, हेमेंद्र गोवेकर, ऋषिकेश खानोलकर, अंबरीश गावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रांताधिकाऱ्यांची कार्यपद्धत संशयास्पद
By admin | Updated: July 29, 2016 23:24 IST