ओगलेवाडी : हजारमाची ता.कऱ्हाड ग्रामपंचायतीतील सत्ताधारी हे विरोधी सदस्यांना विश्वासात न घेता व सभेपुढे विषय न घेताच, मनमानी पद्धतीने कामे करीत आहेत. सभा सुरू असताना इतिवृत्त लिहिण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे बुधवारी विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती सदस्य शरद कदम यांनी दिली.
हजारमाची ग्रामपंचायतीतील सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारीशाहीची माहिती देण्यासाठी विरोधी सदस्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सदस्य शरद कदम, पितांबर गुरव, विनोद डुबल, संगीता डुबल, सारिका लिमकर, ऐश्वर्या वाघमारे, जयश्री पवार, ॲड.चंद्रकांत कदम, ॲड.दादासाहेब जाधव, नंदकुमार डुबल, बबनराव पवार, कुमार इंगळे, बाबासाहेब पावार, जयवंत वीरकायदे, सतीश पवार, राजू काटवटे आदींची उपस्थिती होती.
शरद कदम म्हणाले, ‘ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामांची नियमाप्रमाणे सभेत चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, असे न होता, सभेत केवळ पाच ते सहा विषय होतात. सभेनंतर सत्ताधारी हवे ते ठराव इतिवृत्तात घुसडतात, तसेच तीन लाखांच्या पुढच्या कामांचे टेंडर काढणे गरजेचे असतानाही नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे विरोधी सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सभा सुरू असताना, इतिवृत्त लिहिण्याची मागणी केली होती. त्यानुसार, गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना तसे आदेश दिले होते. मात्र, बुधवारी झालेल्या सभेत त्याच वेळी इतिवृत्त लिहिण्यास ग्रामसेवकांनी असमर्थता दर्शविल्याने उपस्थित असलेल्या विरोधी सात सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर, केवळ सहा सत्ताधारी सदस्य असताना व कोरम पूर्ण नसतानाही सभा घेण्यात आली.
संगीता डुबल म्हणाल्या, ‘ग्रामपंचायतीत सरपंचाचे दीर, उपसरपंच व ग्रामसेवकच मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. विरोधी दूरच सत्ताधारी सदस्यांनाही अनेक गोष्टींची कल्पना नसते. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी सदस्यांच्या मागणीची दखल घेतली जात नाही.’
शरद कदम म्हणाले, ‘ग्रामपंचायतीच्या करवसुलीचे नियोजन नसल्याने सत्ताधारी सर्व कामे पंधराव्या वित्त आयोगातून करण्यात येत आहेत. सध्या पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ऐंशी लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. आराखड्याबाहेरील कामांना परवानगी नसतानाही पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे खर्च करण्यात येत आहेत.’
चौकट
न केलेल्या कामांचेही श्रेय घेण्यासाठी आटापिटा
गेल्या पंचवार्षिकमध्ये मंजूर झालेल्या कामांचे नारळही सत्ताधारी फोडत असल्याचा आरोप माजी सरपंच सतीश पवार यांनी केला. इंदिरानगर व राजारामनगर येथील काँक्रिट रस्ता व गटर गेल्या पंचवार्षिकमध्ये मंजूर झाले असताना, गुरुवारी सत्ताधाऱ्यांनी या कामाचे नारळ फोडण्याचा घाट घातला आहे. मात्र, या कामांची वर्कऑर्डर मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या हस्ते शुभारंभ करणार असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले
चौकट 2
विरोधी सदस्यांच्या मताचाही आदर करणार
‘विरोधी सदस्यांच्या लोकहिताच्या सर्व प्रस्तावांना मान देऊन तेही मंजूर करणार आहे, परंतु त्यांनी सभेला पूर्ण वेळ हजर राहून सहकार्य करावे. हजारमाची गावाचे लोकहिताच्या प्रश्नासाठी सर्व जण मिळून काम करू यात,’ असे मत उपसरपंच प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.