बामणोली बीटातील 35 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : कोरोना काळात उद्योग, व्यवसाय अडचणीत आलेले असताना बालरक्षक प्रतिष्ठानने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी बामणोलीसारख्या दुर्गम भागातील ३५ शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले. प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे’, असे गौरवोद्गार जावळी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव-भुजबळ यांनी काढले.
बालरक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत जावळी तालुक्यातील बामणोली बीटमधील ३५ शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला ग्रामपरिवर्तन संस्था, कटगुणचे अध्यक्ष प्रताप गोरे, बामणोली केंद्रप्रमुख विजय देशमुख, मुख्याध्यापक महेश पडलवार, दीप्ती कदम, अश्विनी गुरव, माधवी शिंगटे, सुनीता कदम, सखाराम मालुसरे, नीलेश उतेकर, संतोष कदम, संतोष लोहार, ए. बी. जाधव, ज्ञानदा गुरव उपस्थित होते.
यादव म्हणाल्या, ‘प्राथमिक शाळेतील शिक्षक झोकून देऊन काम करत असल्याने दिवसेंदिवस या शाळांचा पट वाढत आहे. कोरोनाच्या संकटात शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. बामणोलीसारख्या दुर्गम भागातील शाळांचे काम निश्चितच समाधानकारक आहे. याकरिता बालरक्षक प्रतिष्ठानने या भागातील शाळांना केलेली मदत निश्चितच अनुकरणीय आहे.’
प्रताप गोरे म्हणाले, ‘जावळी तालुक्यातील बामणोली हा अतिशय दुर्गम व डोंगराळ आहे. अतिवृष्टीने या भागात खूपच नुकसान झाले आहे. या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आमच्या संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य देऊन छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.’
दीपक भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र इंगवले यांनी सूत्रसंचालन केले तर मिलन शिंदे यांनी आभार मानले.