अंगापूर : चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथे धरणी माता फाउण्डेशनच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्ष अश्विनी राऊत, रूपाली भोसले (समुपदेशक), मेघा कांबळे (योगा शिक्षिका) उपस्थित होत्या. या कार्यक्रमास सातारा विभागातील विविध गावांमधील ५४ महिला उपस्थित होत्या. या निमित्ताने महिलांच्या समस्या या विषयीचे मार्गदर्शन रूपाली भोसले यांनी केले. मेघा कांबळे (योगतज्ज्ञ) यांनी महिलांना विविध योग आसनांचे प्रात्यक्षिक करून त्याचे महत्त्व समजावून सांगितले.
संस्थेच्या अध्यक्ष अश्विनी राऊत यांनी विविध खेळांच्या माध्यमातून महिलांना एकजुटीचे व संघटनेचे महत्त्व पटवून दिले. तसेच महिलांनी सुरू केलेल्या लघुउद्योगाबाबत इतर महिलांना मार्गदर्शन केले. या निमित्ताने उपस्थित महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.