लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नातेवाइकांकडे लग्नाला आलेल्या महिलेचे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण राहत्या घरातून चोरट्याने लांबविले. वळसे (ता. सातारा) येथे ९ जानेवारीला ही घटना घडली.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वळसे येथील संगीता संजय वडर यांच्या मुलीचे लग्न ९ जानेवारीला होते. त्यासाठी त्यांची भावजय सुनंदा नलवडे या कुटुंबीयांसह वळसे येथे ८ जानेवारी रोजी आल्या होत्या. रात्री त्यांनी त्यांचे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण, नेकलेस व पेंडंट भावजय संगीता वडर यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. त्यांनी ते दागिने घरातील डब्यात ठेवले.
लग्नाच्या दिवशी सुनंदा नलवडे यांनी दागिने मागितले असता डब्यात केवळ नेकलेस असल्याचे आढळले. चोरट्याने गंठण व पेंडंट असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. यानंतर ते घरी निघून गेले. नातेवाइकांकडे पुन्हा विचारपूस केल्यानंतर बुधवारी सुनंदा नलवडे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास हवालदार बाबा महाडिक हे करीत आहेत.