भुर्इंज : नेट उत्पादनात आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रेसर असणाऱ्या वाई एमआयडीसीतील सर्वात मोठ्या उद्योगावर तालुक्यातील ८ हजार कामगार अवलंबून आहेत. मात्र या उद्योगात काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनामुळे येथील अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा आहे. १५ दिवसात वाई येथून या कंपनीची दोन युनिट बारामती व पुणे येथे हलवण्यात आल्याने या उद्योगाच्या स्थलांतराची सुरुवात झाली की काय? असा प्रश्न निर्माण झाला असून याबात समन्वयातून तोडगा काढून औद्योगिक वसाहतीतील हा सर्वात मोठा उद्योग टिकवावा, अशी मागणी होत आहे. मात्र याबाबत कंपनीचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. वाई एमआयडीसीत जे मोजके मोठे उद्योग आहेत त्यामध्ये हा उद्योग सर्वात मोठ्या प्रमाणावर स्थानिक कामगारांना रोजगार देणारा उद्योग आहे. गेली १८ या वर्ष कंपनीचे कामकाज येथे सुरळीतपणे सुरु होते. किंंबहुना त्यामुळेच कंपनीचा वेळावेळी विस्तार करुन एक्स्पोर्ट क्वॉलिटीचे उत्पादन येथे सुरु करण्यात आले. आणखी विस्तार करण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र काही महिन्यापांसून कंपनीत सुरु झालेल्या आंदोलनामुळे विस्तारीकरणाचे कामकाज ठप्प करुन उलट वाई येथे सुरु असणारे काम अन्यत्र हलवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. १५ दिवसांत वाईतील ७ युनिटपैकी २ युनिट बंद करुन बारामती व पुणे येथे हलवल्याचे समजते. येत्या काही दिवसांत आणखी एक युनिट अन्यत्र हलवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)
वाईतील कंपन्या स्थलांतराच्या वाटेवर
By admin | Updated: February 6, 2015 00:48 IST