सातारा : ‘गुंडांच्या मागे कोण आहे, हे मला बोलायला लावू नका. सगळंच बोललो तर हे उघडे पडतील,’ असे भाष्य खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. गुंडांच्या विरोधात तक्रार दाखल करणारा मी एकमेव खासदार असल्याचे सांगतानाच सातारकर सुरक्षित राहावेत, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.‘सातारची गुंडगिरी कशामुळे वाढली,’ असा प्रश्न विचारला असता उदयनराजे म्हणाले, ‘गुंडांना पाठीशी घातलं जातं. थर्ड क्लास माणूस पत्रकारावर हात उगारतो. हे धाडस कशामुळे वाढतं?’ प्रसन्ना पोलीस अधीक्षक असताना ‘क्राईम रेट’ वाढला होता. त्यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील होते. ‘अजित द ग्रेट पवार’ अशी खिल्ली उडवत उदयनराजे पुढे म्हणाले, ‘जनता यांचे किती सहन करणार? लोकांच्या जिवावर हे लोक निवडून जातात. त्यामुळे लोकांचा नको का अंकुश तुमच्यावर? जे- जे लोक कारणीभूत आहेत, त्यांच्या (गुंडांच्या) मागे कोण आहे, हे मला माहिती आहे. सगळंच बोललं तर हे उघडे पडतील. असाही टोला त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता लगावला. लोकांचे प्रश्न घेऊन गुंडांच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल करणारा खासदार आताच्या परिस्थितीत कोणी नसेल. तुम्ही सगळे सुरक्षित राहावे, अशी माझी मनापासून धडपड आहे.’‘मी पक्ष कधीच मानला नाही. माझा जनता हाच पक्ष आहे. एकटा उदयनराजे काही करू शकणार नाही. सगळ्यांनी एकत्र यायला हवं,’ असे ते म्हणाले. ‘पुढील काळात मनोमिलन राहाणार का,’ असा प्रश्न उपस्थित केला असता ‘त्यांच्या वक्तव्यावरून बघितलं तर आम्ही फुटपाथवर! पण मी तत्त्वाशी एकनिष्ठ आहे. नाही तर तुम्ही इथे आणि मी रॉकेटमधून चंद्रावर गेलो असतो,’ असे वक्तव्य उदयनराजेंनी केले. ‘मी रागाने बोलत नाही,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
गुंडांच्या मागे कोण.. बोलायला लावू नका!
By admin | Updated: November 11, 2014 23:16 IST