- प्रगती जाधव-पाटीलसातारा - वाई तालुक्यातील फुलेनगर येथील प्रयोगशील युवा शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन काही हटके प्रयोग करण्याच्या उद्देशाने या स्ट्रॉबेरीची लागवड केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बाजारातील मागणी लक्षात घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा प्रगतिशील शेतकरी उमेश खामकर यांनी निवडला आहे.
देशातील पहिला प्रयोग वाईतफ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचे पीक पहिल्यांदा अमेरिका आणि युकेमध्ये घेण्यात आले. याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये याचे उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. भारतात मात्र हा प्रयोग करण्यासाठी पहिला प्रयत्न असल्याचा दावा उमेश खामकर यांनी केला आहे. यासाठी फ्लोरिडा विद्यापीठाची रॉयल्टी राइट्स त्यांनी विकत घेतले. त्यामुळे भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असेल्यास खामकर यांची परवानगी लागेल.
२० गुंठे क्षेत्रात १० हजार रोपे लावलीनोव्हेंबर २०२३ मध्ये २० गुंठ्यांच्या क्षेत्रात खामकर यांनी दहा हजार रोपे लावली. यातून जानेवारीमध्ये उत्पन्नास सुरुवात झाली. साताऱ्यासह अन्य ठिकाणीही त्यांनी फळे विक्रीला ठेवली. पांढरी स्ट्रॉबेरी सहापट उत्पन्न देत असल्याचे ते सांगतात.
फ्लोरिडा पर्लची ही आहे खासियतस्ट्रॉबेरी म्हटलं की, आंबटपणा अगदी ठरलेला असतो, मात्र फ्लोरिडा पर्ल याला अपवाद आहे. अन्य स्ट्रॉबेरीच्या जातींच्या तुलनेत ही नैसर्गिकदृष्ट्या गोड स्ट्रॉबेरी आहे.
स्ट्रॉबेरीचा ग्राहक लक्षात घेता त्यांना नवनवीन प्रकारच्या स्ट्रॉबेरी खाण्यामध्ये अधिक रस असतो. वर्षानुवर्षे लाल चुटूक स्ट्रॉबेरी खाणाऱ्या ग्राहकाला फ्लोरिडा पर्ल निश्चितच आकर्षित करणारी आहे. - उमेश खामकर, प्रगतिशील शेतकरी