लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ‘सहा वर्षांपूर्वी आम्ही प्रतिकूल परिस्थितीत कृष्णा कारखान्यात सत्तेवर आलो; पण सर्व संकटांवर मात करत आज आम्ही कृष्णा कारखाना मजबूत स्थितीत आणला. याउलट पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र कारखाना डबघाईस आणला होता. असे विरोधक पुन्हा सत्तेवर येऊन सभासदांचे काय भले करणार आहेत,’ अशा शब्दांत कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकार पॅनलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
इस्लामपूर (ता. वाळवा) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत डाॅ. भोसले बोलत होते. यावेळी रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातील उमेदवार संजय पाटील, जितेंद्र पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भगवान पाटील, आनंदराव पाटील, सुनील पाटील, केदार पाटील, युवराज जाधव, शहाजी पाटील, संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोसले म्हणाले, ‘आमचा व इस्लामपूरचा संबंध पूर्वीपासून आहे. इथले लोक नेहमीच चांगल्या विचारांच्या पाठीशी राहिले आहेत. विरोधक निवडणूक आली की, कृष्णा हॉस्पिटलचा मुद्दा प्रचारात घेतात; पण कृष्णा हॉस्पिटल ही आरोग्यसेवा देणारी पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची संस्था आहे. कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलने भरीव कामगिरी केली आहे; पण विरोधक असणारे आमचे डॉक्टर बंधू यांनी एका तरी कोरोना रुग्णावर उपचार केले का? चांगल्या चाललेल्या संस्थांवर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरा उद्योग नाही, तर दुसऱ्या विरोधकांच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची माहिती सर्व सभासदांना आहेच. आता सत्तेत कधी जातोय, याची त्यांना स्वप्ने पडू लागली आहेत.
येत्या काळात कृष्णा कारखान्याचा विस्तार करण्याचा आमचा मानस असून, उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत. कृष्णा कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहनही डॉ. भोसले यांनी केले.
यावेळी संपत खांबे, शशिकांत पाटील, युवराज जाधव, विश्वासराव पाटील, जयराज पाटील, विजय खांबे, सुनीता संकपाळ, संगीता कांबळे, नारायण पाटील, एम. जी. पाटील, महेश पाटील, अर्जुन जाधव, संतोष जाधव, माणिक मोरे, रजनीकांत मोरे, बाळासाहेब पाटील, श्री. शैलेश पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत देसाई आदींसह सभासद उपस्थित होते.
फोटो ओळी :
इस्लामपूर, ता. वाळवा येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारफेरीला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इस्लामपूर, ता. वाळवा येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित सभेत डॉ. सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन केले.