सातारा : शेतजमिनीची महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध होणारे कार्यालय म्हणून भूमिअभिलेख कार्यालयाकडे पाहिले जाते; पण या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आता २0 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. तरीही तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या कार्यालयाकडील शेतकऱ्यांचे हेलपाटे अद्यापही थांबलेले नाहीत.जमिनीसंदर्भात महत्त्वाची कागदपत्रे मिळतात, ती भूमिअभिलेख कार्यालयात. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय असते. या कार्यालयाशी शेतकऱ्यांचाच अधिक करून संबंध येत असतो. कारण, भूमिअभिलेख कार्यालयात जमिनीसंदर्भातील नकाशा, नकला, स्कीम बुक उतारा, फाळणी नकाशा मिळत असतो. असे नकाशे हे जतन करून ठेवण्याचे व अर्ज केल्यावर शेतकऱ्यांना देण्याचे काम या कार्यालयामार्फत होत असते. तसेच जमिनीची मोजणीही या कार्यालयामार्फत करण्यात येते. शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या या कार्यालयातील कामकाज मागील २0 दिवसांपासून बंद आहे. विविध मागण्यांसाठी भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. सातारा जिल्ह्याच्या विचार करता ११ तालुक्यांच्या ठिकाणी कार्यालये आहेत. तसेच इतर दोन अशी मिळून १३ कार्यालये जिल्ह्यात कार्यरत आहेत. येथील सर्वच कामे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेकडो अर्ज या कार्यालयाकडे पडून आहेत. आज, उद्या आंदोलन संपेल म्हणून शेतकरी हेलपाटे मारत आहेत. पण, त्यांना एकच उत्तर मिळत आहे, ते म्हणजे ‘काम बंद आहे’.कर्मचाऱ्यांचे आंदोलन कधी संपणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)गेल्या २0 दिवसांपासून भूमिअभिलेखमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील कार्यालयातही शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबून राहिली आहेत. या आंदोलनाबाबत वरिष्ठांशी संपर्क साधला आहे. आंदोलन मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांची कामे लवकरात लवकर कशी पूर्ण होतील, याकडे लक्ष देण्यात येईल.-सुदाम जाधव, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय
शेतकऱ्यांचे हेलपाटे काय थांबेनात !
By admin | Updated: February 4, 2015 23:52 IST