फलटण : जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग (श्रीराम सहकारी साखर कारखाना) रामनगर, फलटण येथे साताराचे सहायक वैधमापन शास्त्र नियंत्रक रा. ना. गायकवाड व सहकाऱ्यांनी अचानक भेट देऊन इलेक्ट्रॉनिक ऊस वजन काटा व संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करुन सर्व यंत्रणा योग्य व नियमानुसार असल्याचा निर्वाळा दिला आहे.
श्रीराम जवाहर साखर उद्योगाने या हंगामात आज ९१ व्या दिवसाखेर २ लाख ७५ हजार ९५८ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ३ लाख १४ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्र राज्य वैधमापन शास्त्र नियंत्रक, मुंबई यांनी संपूर्ण राज्यातील सर्व साखर कारखान्यांची ऊस वजन यंत्रणा तपासून ती निर्दोष असल्याची खात्री करण्याचे निर्देश दिनांक १५ जानेवारी रोजी दिल्याच्या पार्श्वभूमीवर सहायक वैधमापन शास्त्र नियंत्रक गायकवाड यांनी श्रीराम जवाहरच्या या यंत्रणेची तपासणी केली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक ऊस वजन काटा व संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करून सर्व यंत्रणा योग्य व नियमानुसार असल्याचा निर्वाळा दिला.