सातारा : ‘तालुक्यात कृषी- औद्योगिक विकासाबरोबरच हरित क्रांती घडवून आणण्यासाठी दिवंगत अभयसिंहराजे तथा भाऊसाहेब महाराज यांनी अथक परिश्रम घेतले. सर्वसामान्यांच्या सुख-दुख:त एकरूप होऊन त्यांनी रयतेशी जिव्हाळ्याचे नाते जपले. त्यांच्या अमूल्य स्मृती जपत त्यांच्या समाजाभिमुख विकासकार्याचा आदर्श आपण पुढे चालवीत आहोत,’ असे प्रतिपादन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्य उद्योग समूहाचे शिल्पकार व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी सहकारमंत्री अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गुरुवारी आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती वनिता गोरे, राजू भोसले, सदस्य प्रा. शिवाजीराव चव्हाण, प्रतीक कदम, अनिल देसाई, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, सदस्या छाया कुंभार, माजी सभापती धर्मराज घोरपडे उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी राज्यातील सहकार क्षेत्रात केलेल्या विकासाचे अनेक पैलू समाजासमोर आहेत.’
संगीतमय आदरांजली...!
अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराजांच्या स्मृती दिनानिमित्ताने लिंब येथील सप्तक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व संतपरंपरेचे दर्शन घडवणारा संगीतमय आविष्कार भजनाचा कार्यक्रम झाला. त्याला उपस्थितांनी दाद दिली.
फोटो ओळ
शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखान्यावर गुरुवारी अभयसिंहराजे भोसले यांना अभिवादन केले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अनिल देसाई उपस्थित होते.