मसूर : कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेतील शेवटचे टोक असलेल्या मसूरच्या पूर्वभागातील गायकवाडवाडी (ता. कऱ्हाड) गावास एप्रिल-मे महिन्यांत सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी कऱ्हाडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना भेटून गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज असल्याचे सांगितले.
दरम्यान, गायकवाडवाडी येथे असलेल्या पाझर गाळ साचला आहे. तो गाळ उचलल्यास तलावाची खोली वाढेल व त्यामध्ये कायमस्वरूपी पाणीसाठा राहून पाणीटंचाई भासणार नाही. गायकवाडवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले. ते म्हणाले, ‘१९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळापासून या पाझर तलावात गाळ साचला आहे. येथील गाळ उचलायला सुरुवात केल्यास अखंड महिनाभर चालेल एवढा गाळ या पाझर तलावात असून, तो उचलल्यास तलावाची उंची वाढून पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध होईल. याबरोबरच तलावाच्या पीचिंगची व दुरुस्तीची कामे झाल्यास भविष्यात पाणीटंचाई भासणारच नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले. सध्या एप्रिल महिन्यातच गावामध्ये एक दिवसाआड नळाला पाणी द्यावा लागत आहे. येत्या आठ दिवसांच्या आत शासनाने टँकर सुरू करावा, अशी मागणी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे केली आहे, तरच गावाला पाणी मिळू शकेल अन्यथा पाण्यासाठी भटकंती करून शिवारातून पाणी आणावे लागेल, अशी या गावची स्थिती झाली आहे.
(कोट)
एप्रिल महिन्यातच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने शासनाने येथील पाहणी करून त्वरित टँकर सुरू करावा व येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा.
- प्रवीण पवार,
उपसरपंच, ग्रामपंचायत, गायकवाडवाडी
१९मसूर
गायकवाडवाडी येथील आटलेला पाझर तलाव.