राहुल तांबोळी :: भुर्इंज ::यंदाच्या दुष्काळाने भयानक स्वरूप धारण केले आहे. भुर्इंजला त्याची झळ तितक्या तीव्रतेने बसली नाही. शेजारीची गावे, तालुके तहानलेली असताना रंगपंचमीवर पाणी उधळणे अशी आमची संस्कृती नाही. त्याच संस्कृतीचे पाईक म्हणून रंगपंचमीदिवशी पाण्याचा वापर टाळावा, कोरड्या रंगाने रंगपंचमी खेळावी, यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करण्याचा निर्धार भुर्इंज ग्रामपंचायतीच्या सभेत एकमताने घेण्यात आला. निम्मा जिल्हा पाण्यासाठी वणवण फिरत असताना ओली रंगपंचमी साजरी केली तर लाखो लिटर पाणी वाया जाणार आहे. आपली संस्कृती जपत असतानाच कोरडी रंगपंचमी साजरी करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने इनिशिएटिव्ह हाती घेतले आहे. या मोहिमेला नेहमीप्रमाणे भुर्इंजकरांनी सर्वप्रथम प्रतिसाद देत मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन कोरडी रंगपंचमी खेळण्याबाबत ठराव संमत केला.सध्या दुष्काळाच्या चटक्यांनी महाराष्ट्र हैराण झाला आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण परिस्थिती उद्भवली आहे. अगदी भुर्इंजपासून जवळ असणाऱ्या गावांनाही टँकरचे पाणी विकत घेऊन गुजरान करावी लागत आहे. घोटभर पाण्यासाठी तडफडणाऱ्या शेकडो गावांमधील वास्तवाचे भान ठेवून रंगपंचमीदिवशी पाण्याचा वापर टाळला जावा. यासाठी भुर्इंज ग्रामपंचायतीने प्रबोधन व जनजागृतीचे पुढे टाकलेले एक पाऊल इतरांसाठी आदर्शवत ठरत आहे. सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसरपंच अनुराधा भोसले यांच्या उपस्थितीत सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. यावेळी बाळासाहेब कांबळे म्हणाले, ‘भुर्इंज गावाला एक वेगळी परंपरा आहे. तहानलेल्यांना पाणी मिळावे, यासाठी ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी धोम आणि कण्हेर धरणांच्या उभारणीसाठी प्रचंड कष्ट उपसले आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली. इतरांच्या जीवनात आनंद फुलावा यासाठी झटण्याची प्रेरणा आणि बळ देणारी इथली माती आहे. या मातीचा गुण आमच्याही अंगी आहे म्हणूनच सध्याच्या या भीषण परिस्थितीत कोरडी रंगपंचमी खेळली जावी याबाबतचा ठराव केला आहे.’ उपसरपंच अनुराधा भोसले म्हणाल्या, ‘एका बाजूला पाण्यासाठी हजारो गावे तडफडत असताना दुसरीकडे पाण्याची व्यर्थ उधळण आणि नासाडी करणे योग्य नाही. दुष्काळी भागात पाण्यासाठी लोक अक्षरश: तडफडत आहेत.’ ग्रामपंचायत सदस्य चंद्रदीप भोसले, मदन शिंदे, प्रशांत जाधवराव, प्रकाश धुरगुडे, प्रकाश ननावरे, शेखर मोरे, नारायण शेडगे, कविता निकम, माया भोसले, अर्चना भोसले, इंदुमती खरे, सीमा कांबळे, ग्रामसेवक व्ही. एन. चव्हाण उपस्थित होते.चांगल्या प्रथा, परंपरा निर्माण करणारे गावभुर्इंज गाव हे चांगल्या प्रथा व परंपरा निर्माण करणारे गाव आहे. डॉल्बी बंदीचा भुर्इंज गावाने घेतलेला निर्णय उभ्या महाराष्ट्रासाठी आदर्शवत ठरला आहे. सामाजिक एकोपा राखत या गावाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना सामाजिक भान सदैव जपण्याचा सदैव प्रयत्न केला आहे. या प्रयत्नातूनच कोरडी रंगपंचमी साजरी केली जावी, यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही चंद्रदीप भोसले, मदन शिंदे, प्रशांत जाधवराव, प्रकाश धुरगुडे, शेखर मोरे यांनी दिली.
शेजारचे तहानलेले असताना पाणी उधळणे संस्कृती नव्हे
By admin | Updated: March 23, 2016 00:35 IST