सातारा : रब्बी हंगामासाठी धोम धरणातून शनिवार, दि. २१ पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवे फोडून पाणी पळवले जाऊ शकते, ही शक्यता गृहित धरून आवश्यकता वाटल्यास पोलीस बंदोबस्त मागविण्याचे नियोजन धोम पाटबंधारे विभागाने केले आहे.ऐन रब्बी पिकांच्या बहरात कालव्यातून पाणीच न सोडल्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिके करपू लागली आहेत. तर ऊस पिकावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. तसेच या कालव्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य पाटासह, पोटपाटाची पडझड झाल्यामुळे पाणी वाया जात आहे. तर कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठून मोठी झुडपे वाढली आहेत. धोम धरणाची घटत असलेली पाणीपातळी जिल्ह्यात चिंतेचा विषय ठरली आहे. ३८२.३२ घनमीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणात सध्या १९२.८६ दशलक्ष घनमीटर इतकी पाणीपातळी आहे. त्यातील १४१.५९ घनमीटर इतके पाणी उपयुक्त आहे. गत पावसाळ्यात धोम परिसरात अत्यल्प पाऊस झाला असल्याने हे धरण भरू शकलेले नाही. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धोम धरणाची पाणीपातळी घटली. आता रब्बी पिकांना पाणी देण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा राखीव साठा धरणात ठेवण्याची कसरत धोम पाटबंधारे विभागाला करावी लागत आहे. धोम उजवा व डावा कालव्यातून जावळी, वाई, कोरेगाव या तालुक्यांमध्ये शनिवारपासून पाणी सोडले जाणार आहे. दि. २१ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या ३५ दिवसांच्या कालावधीचे एक आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. धोमवर असलेल्या बलकवडी धरणातून सध्या धोम धरणामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोडल्यामुळे रब्बी हंगामासाठी धोम उजवा व डाव्या कालव्यात पाणी सोडणे शक्य झालेले आहे. धोमचे पाणी सुटणार असल्याने पाण्याची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या पाण्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, त्याचबरोबर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांच्या पाणी योजनांनाही दिलासा मिळालेला आहे. पाटाच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरी व बोअरचे पाणीही वाढते, हा अनुभव असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) प्रशासनाच्या उपाययोजनारब्बी हंगामाला पाणी मिळण्यासाठी ३१ डिसेंबर मुदतनवीन ऊस लागणीसाठी मंजुरी नाहीमंजूर पिकांव्यतिरिक्त पीक केल्यास त्यांचे पंचनामेअनधिकृत पाणी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवर सिंचन अधिनियम १९७६ नुसार होणार कारवाईधरणांतील सध्याचा पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)धोम : १९२.८६ (५०.४४ टक्के)कण्हेर : १९८.३० (६९.३४ टक्के)येरळवाडी : १०.१८ धोम-बलकवडी : ७०.९९ (६०.२८ टक्के)उरमोडी : २४८.१७ (८७.९५ टक्के)तारळी : १२४.५९ (७५.१६ टक्के)
धोम धरणाचे पाणीआज पाटात सुटणार
By admin | Updated: November 21, 2015 00:21 IST