कोरेगाव : ‘महाराष्ट्रात केवळ चंद्रपूर व वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये झालेली दारूबंदी मर्यादीत न ठेवता एक सामाजिक विषय म्हणून शासनाने राज्यभर लागू करावी, यासाठी वारकरी व महिलांनी उठाव करावा, या चळीवळीची सुरुवात सातारा जिल्ह्यातूनच करू या,’ असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.कोरेगाव येथे पत्रकारांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी आमदार शिंदे म्हणाले, ‘बिहारमध्ये महिलांनी प्रचंड प्रमाणात मतदान करून तेथील राजकारणाच्या दिशा ठरविल्या. त्यामुळे राज्यात दारूबंदी झाली. महाराष्ट्रातही या निर्णयाचे पडसाद उमटू लागले. सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, राणी बंग, मेधा पाटकर यांनी महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. डान्सबार, दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील कर्ता व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब कोलमडून पडते. ही वस्तुस्थिती दाखवणारी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे शासनाने महसुली उत्पन्नाचा विचार न करता एक सामाजिक प्रश्न म्हणून या विषयाकडे बघावे.’‘साताऱ्यात अॅड. वर्षा देशपांडे यांच्याबरोबर इतरही महिलांनी संघटनांच्या प्रतिनिधी तसेच वारकरी संघटना आहेत. या संघटनांनी दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा. दारूबंदीच्या चळवळीच्या पाठीशी मी ठामपणे उभा असेन,’ अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीसाठी वारकरी, महिलांनी उठाव करावा
By admin | Updated: December 5, 2015 00:25 IST