किडगाव : जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी बहुतांश ठिकाणी वळवाने पुन्हा हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची धांदल उडाली. सातारा तालुक्यातील धावडशी, आकले, चिंचणी या परिसराला वळवाने चांगलेच झोडपून काढले. सोसाट्याचा वाऱ्यामुळे ठिकठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी घरांना भेगा पडल्या. विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सोसाट्याच्या वाऱ्यात छप्पर रस्त्यावरधावडशी येथील नारायण साहेबराव पवार यांचे जनजीवन शेतीवर अवलंबून असून यांच्या घराचे बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. पावसामुळे त्यांच्या घराचे छप्पर पूर्णत: कोसळून रस्त्यावर आले तर लोखंडी अँगलही वाकले. घराला ठिकठिकाणी भेगा पडल्याने धोका निर्माण झाला आहे. तसेच घरातील कांदे, भुईमूग, ज्वारी, शेंगा यांसह कडधान्य पावसात भिजले. घरातील संगणक, टीव्ही, टेबल, खुर्च्या यासह इलेक्ट्रीक उपकरणांचीही मोडतोड झाली आहे. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने शेतकरी नारायण पवार यांनी शासनाकडून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. दैव बलवत्तर म्हणून वाचलो बुधवारी दुपारी धावडशीसह परिसरात वळवाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळाधार पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याने येथे राहणाऱ्या नारायण पवार यांच्या घराचे पत्रे उडून गेले. पाऊस सुरू असताना पवार कुटुंबिय घरात होते. घराचा पत्रा वर उचलत असल्याचे दिसताच नारायण पवार कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी आले. यानंतर काही क्षणातच त्यांच्या घराचे संपूर्ण पत्रे वादळी वाऱ्याने उचकटून रस्त्यावर येऊन पडले. हे दृश्य पाहून परिसरातील ग्रामस्थांमध्ये मात्र, धावपळ उडाली. पावसामुळे पवार यांचे संसारोपयोगी साहित्य संपूर्ण भिजून गेले. व भिंतीना भेगा पडल्या. दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही सर्वजण या संकटातून वाचलो, अशी प्रतिक्रिया पवार कुटुंबियांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सगळाच प्रकार सुन्न करणाराचिंचणी गावच्या जयवंताबाई साबळे यांच्या घराची एका बाजूची भिंत बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात पडली. तसेच आकले गावचे तानाजी खाशाबा इंदलकर यांच्याही घरांचे पत्रे, कौले उडाले. त्यांच्या घराचे संपूर्ण आडे तुटले असून घराच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. या पावसामुळे नारायण पवार, जयंताबाई साबळे आणि तानाजी इंदलकर यांचे मिळून सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. नुुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.
भिंत पडली, चूल विझली.. होते नव्हते गेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 23:54 IST