गुहागर : विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे स्वामी विवेकानंदाचे आणि संस्कृत पंडित सीताराम देसाई यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीचे स्मारक आडे येथे संस्कारक्षम पिढी घडविण्यास उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.ते दापोली तालुक्यातील आडे गावातील स्वामी विवेकानंद स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. आडे येथे समुद्रकिनारी डॉ. मेधा मेहंदळे आणि कुटुंबियांनी बांधलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन दि. १४ मार्च रोजी आमदार संजय केळकर आणि प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कन्याकुमारी देवी, स्वामी विवेकानंदाच्या पुर्णाकृती पुतळा आणि संस्कृत पंडित सीताराम देसाई यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.यावेळी बोलताना केळकर म्हणाले की, आडे येथे उभे राहिलेले विवेकानंदांचे स्मारक पर्यटन उद्योगाला चालना देईल. त्याशिवाय येथील विद्यार्थी, अभ्यासू व्यक्ती यांना येथील वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यास करता येईल. दुर्गम भागात अशा प्रकारचे ज्ञानकेंद्र उभारण्याचा संकल्प कौतुकास्पद असल्याचेही संजय केळकर यांनी यावेळी सांगितले. हे स्मारक उभे करण्यासाठी तनमनधनपूर्वक कार्य करणाऱ्या डॉ. मेधा मेहंदळे म्हणाल्या की, ज्या आईने मला घडविले तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्याचे भाग्य मला लाभले. आज तिच्याच उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असल्याने आजचा दिवस माझ्यासाठी गौरवशाली आहे.या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात ‘विवेकानंद गीतांजली’ या गीतगायनाच्या कार्यक्रमाने झाली. डॉ. सुलभा रानडे यांनी निवेदनातून विवेकानंदाच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन केले आणि त्या प्रसंगाला अनुरूप गीते डॉ. विष्णू रानडे यांनी सादर केली. त्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी कोकण कला अकादमी प्रस्तुत विवेकानंदाच्या जीवनावरील ‘सन्यस्त ज्वालामुखी’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये डॉ. मेधा मेहंदळे यांच्या मातोश्री कुसुम देसाई, माजी उपसभापती रवींद्र सातनाक, स्मारकाचे विकासक विक्रांत सप्रे (इंदापूर), ब्राँझचे पुतळे बनविणारे शिल्पकार जयेंद्र शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मानसी धामणकर आणि डॉ. रुचा पै यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आडे झाले विवेकानंदमयआजचा समारंभ बिगर राजकीय असल्याने स्वामी विवेकानंदमय झाला होता. विवेकानंदांच्या जीवनावरील गीते, त्यांचे निवेदन, त्यांच्याच जीवनावरील नाटक यामुळे संपूर्ण कार्यक्रमातून विवेकानंदाचा जीवनपट उलगडला गेला आणि त्याचा आस्वाद ग्रामस्थांना घेता आला.
विवेकानंदाचे स्मारक संस्कारक्षम पिढी घडवेल
By admin | Updated: April 17, 2016 23:31 IST