सातारा : वाहतूकदारांचा संप सुरू असूनही मालवाहतूक करणारे सात ट्रक साताऱ्याजवळ महामार्गावर अडवून संपकऱ्यांनी त्यांच्या चाकातील हवा सोडून दिली. तसेच तीन ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी काही ट्रकवर दगडफेक केली. यामध्ये चार ते पाच ट्रकच्या काचा फुटून नुकसान झाले. या घटनांमुळे महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.याबाबत हकीकत अशी की, टोलचे पैसे देतो; पण टोलनाके बंद करावेत, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी वाहतूकदारांनी बेमुदत ‘चक्का जाम’ आंदोलन सुरू केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला या संपातून वगळण्यात आले आहे. मात्र, महामार्गावरून काही वाहतूकदार मालवाहतूक करीत आहेत. संपकरी वाहतूकदारांना ही माहिती समजताच शहराजवळील बाँबे रेस्टॉरंट चौक ते अजंठा चौक यादरम्यान वाहतूक करणारे ट्रक सोमवारी दुपारच्या सुमारास अडविण्यात आले. आंदोलकांनी सात ट्रकच्या चाकांमधील हवा सोडून दिली. तसेच तीन ट्रकच्या काचा फोडल्या. दरम्यान, या घटनांमुळे वाहतूक करणारे ट्रकचालक, क्लीनर भेदरून गेले.अचानक झालेल्या तोडफोडीच्या घटनांची माहिती शहर पोलीस ठाण्यात समजताच पोलिसांची कुमक घटनास्थळी पाठविण्यात आली. मात्र, तोपर्यंत तोडफोड करणारे अज्ञात आंदोलक घटनास्थळावरून पळून गेले होते. पोलिसांनी तातडीने या भागात जादा बंदोबस्त तैनात केला. तसेच महामार्गावरील शहराजवळील इतर चौक आणि मोक्याच्या ठिकाणीही बंदोबस्त लावला. शहर पोलिसांची गस्ती वाहने महामार्गावरून फिरू लागली. तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनेही त्या हद्दीत गस्त सुरू करण्यात आली. दरम्यान, तोडफोडीसंदर्भात पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती; तसेच कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)कऱ्हाडमध्येही तोडफोडकऱ्हाड : माल वाहतूकदारांच्या संपाला सोमवारी कऱ्हाडातही हिंसक वळण लागले. महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी काही ट्रकवर दगडफेक केली. यामध्ये चार ते पाच ट्रकच्या काचा फुटून नुकसान झाले. दगडफेकीनंतर पसार झालेल्या आंदोलनकर्त्यांचा पोलीस रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. संपामुळे सध्या ठिकठिकाणी मालट्रक थांबून आहेत.सोमवारी काही आंदोलनकर्त्यांनी पुणे-बंगळूर महामार्गावर पाचवड फाटा येथे वाहने अडविली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहनधारक बुचकळ्यात पडले. आंदोलनकर्त्यांनी काही ट्रक अडवून धरले. ‘संप सुरू असताना माल वाहतूक का करता,’ असे म्हणत काही ट्रकवर दगडफेक केली. पोलीस पोहोचण्यापूर्वीच आंदोलनकर्ते पसार झाले.काही वेळातच कऱ्हाडनजीक वारुंजी फाटा परिसरात महामार्गावर वाहने अडविण्यात आली. तेथेही दोन ट्रकवर दगड मारण्यात आले. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तेथे पोहोचले. पाचवडफाटा व वारूंजी येथे दगडफेक झालेले सर्व ट्रक रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ट्रकचालकांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात संपाला हिंसक वळण
By admin | Updated: October 6, 2015 00:23 IST